बॉलिवूडमधील मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता, त्यांचा हा आजार पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दृश्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव महाराष्ट्रात काना-कोपऱ्यात पोहोचलं होतं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.

सोमवारी सकाळपासूनच निशिकांत यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र त्यावेळी ते जीवन रक्षक प्रणालीवर असल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलं होतं. आता दुपारी साडेचारवाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निशिकांत कामत यांना ३१ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून ते लिव्हर सिरॉसिस Liver Cirrhosis या आजाराशी लढा देत होते. आज दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहिली. ‘मित्रा, तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या.