आलियाविरोधात मानहानीचा दावा; चित्रपट प्रदर्शनाआधीच पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पुस्तकाच्या लेखकासह सिनेमा निर्माते आणि आलियाला न्यायालयाकडून समन्स

या पुस्तकातील नमूद गोष्टी मानहानी करणाऱ्या आणि चुकीच्या असल्याचे सांगत गंगूबाई काठियावाडी यांचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी शहा यांनी शिवडी सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला आहे.

    मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भटचा बहुचर्चित चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मुंबईतील शिवडी सत्र न्यायालयाने चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आलिया भट आणि दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी यांना समन्स जारी केले आहे.

    हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित भन्साळी यांच्या आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट बेतलेला असून पुस्तकासाठी जेन बोर्गिस यांनी संशोधन केलं आहे. या पुस्तकातील नमूद गोष्टी मानहानी करणाऱ्या आणि चुकीच्या असल्याचे सांगत गंगूबाई काठियावाडी यांचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी शहा यांनी शिवडी सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला आहे.

    या सिनेमामुळे आमची आणि आमच्या परिवाराची बदनामी होत आहे असा दावा शहा यांनी केला आहे. त्याची गुरूवारी शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने दखल घेत २१ मे रोजी आलिया आणि भन्साळी यांच्यासह चित्रपटाच्या लेखकालाही न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

    याआधीही शहा यंनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच हा दावा जाणीवपूर्वक केला असल्याचा युक्तिवाद भन्साळी यांच्याकडून करण्यात आला होता. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने शहा यांची मागणी आणि याचिका फेटाळून लावली होती.