‘आपलीच मोरी आणि… चोरी’ सरू आजींच्या ‘त्या’ संवादामुळे देवमाणूस मालिका वादात, वाहिनीने दिलं हे स्पष्टीकरण!

१३ जुलै रोजी ‘देवमाणूस’चा एक भाग प्रदर्शित झाला होता. या भागात सरुआजीने नेहमी प्रमाणे एक म्हण म्हटली, ‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी’ या आशयाची ही म्हण त्यावेळी संवादात वापरण्यात आली होती.

    छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेच्या सीनची नेहमीच चर्चा होते. यावेळी, मालिकेत सरुआजी हे पात्र आणि त्यांच्या एका संवादामुळे चर्चा रंगली आहे. काहीशी टीकाही होत आहे.

    १३ जुलै रोजी ‘देवमाणूस’चा एक भाग प्रदर्शित झाला होता. या भागात सरुआजीने नेहमी प्रमाणे एक म्हण म्हटली, ‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी’ या आशयाची ही म्हण त्यावेळी संवादात वापरण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मालिकेतील प्रसंगाच्या या व्हिडिओत ‘आपलीच मोरी आणि…’ या संवादात एक अश्लील अपशब्द कानावर पडत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत मालिकेवर आणि वाहिनीवर टीका होत आहे.

    प्रेक्षकांनी आणि नेटकऱ्यांनी टीका केल्याचे पाहताच वाहिनीने स्पष्टीकरण दिले आहे. झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर म्हणाले, “हा खोडसरपणा आहे. मुद्दाम वाहिनीचं नाव खराब करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अश्लील शब्द वापरला गेल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. एक जबाबदार वाहिनी म्हणून आम्ही मालिकेच्या संवादात कोणत्याही अश्लील शब्द किंवा संवादाचा वापर केला नाही. संवादात कधीही चुकूनही कोणता अपशब्द येऊ नये; हे पडताळून पाहण्यासाठी वेगळी टीम कार्यरत असते. तसंच ज्यांच्या तोंडी हा संवाद आहे; त्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत; त्या अशाप्रकारचा संवाद मुळात बोलणारच नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर जे बोललं जात आहे ते चुकीचं आहे.”