देवों के देव महादेव’ ही मालिका पुन्हा रसिक दरबारी!

देवों के देव महादेव' ही मालिका पुन्हा रसिक दरबारी सादर करण्याची योजना आखली आहे. पहिल्या भागापासून आपला वेगळा चाहता वर्ग तयार करणारी ही मालिका रसिकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती

    भोलेनाथांच्या भक्तांसाठी एक खुशखबर आहे. छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा महादेव प्रगटणार आहेत. ‘राधाकृष्ण’ आणि ‘मन की आवाज प्रतिज्ञा २’ द्वारे रसिकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत असलेल्या स्टार भारतवर पुर्नप्रसारीत होणाऱ्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

    हाच धागा पकडून वाहिनीनं आता ‘देवों के देव महादेव’ ही मालिका पुन्हा रसिक दरबारी सादर करण्याची योजना आखली आहे. पहिल्या भागापासून आपला वेगळा चाहता वर्ग तयार करणारी ही मालिका रसिकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी महादेव पुन्हा प्रगटणार आहेत. या मालिकेत मोहित रैनानं साकारलेली महादेवांची भूमिका चांगलीच गाजली होती.

    महादेवांच्या जीवनातील प्रत्येक पैलू मोहितनं अगदी सहजपणे सादर करत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं होतं. यासोबतच मौनी रॉय, सौरभ राज जैन, सोनारिका भदौरिया, पूजा बनर्जी, ऋषिराज पवार या कलाकारांनी पौराणिक व्यक्तिरेखांच्या रूपात दर्शन दिलं होतं. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यासाठी ही मालिका सज्ज झाली आहे.