rajesh deshpande 1

प्रिया बेर्डे, अमर गवळी, सायली गवळी या नाटकाचे निर्माते असून, सूत्रधार गोट्या सावंत आहेत. प्रिया बेर्डेंसह प्रभाकर मोरे, स्वानंदी बेर्डे, चैतन्य सरदेशपांडे, निलंय घैसास, मृगा बोडस, चेतन चावडा या कलाकारांच्या नाटकात भूमिका आहेत.

  संजय घावरे

  लॅाकडाऊनच्या काळात टीव्ही मालिका आणि वेबसिरीजने प्रेक्षकांचे मनोरंजन केले असले तरी खऱ्या अर्थाने निखळ मनोरंजनाच्या शोधात असलेल्या रसिकांसाठी नाटकाशिवाय पर्याय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या पूर्वी गाजलेल्या नाटकांनाही प्रेक्षक गर्दी करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे नवीन नाटकांच्या योजना आखलेल्या रंगकर्मींनाही हुरूप आला असून, पहिल्या नव्या कोऱ्या नाटकाच्या शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला आहे. नाटक असो वा सिनेमा आपल्या कलाकृतींद्वारे नेहमीच प्रेक्षकांना हसवता-हसवता अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते राजेश देशपांडे यांनी धाडसी पाऊल उचलत नवीन नाटकाचा मुहूर्त केला आहे. लॅाकडाऊनच्या काळात घरात कोंडलेल्या रसिकांना आज खरेखुरे मनोरंजन हवे असल्याचे राजेश यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

  राजेश देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘धनंजय माने इथंच राहतात’ हे नाटक रंगभूमीवर अवतरणार आहे. श्रीमंथ एन्टरटेन्मेंट प्रा. लि. आणि व्ही. आर. प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन नितीन चव्हाण यांनी केले आहे. नाटकाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेबाबत देशपांडे म्हणाले की, आम्ही या नाटकाची योजना लॅाकडाऊनमध्येच आखली होती. नाटकाचे आॅनलाईन वाचन करण्यात येत होते. मिटींगही व्हायच्या. प्रत्येकाशी संपर्क साधला जायचा. प्रत्येकाला आपले काम समजावून सांगितले जायचे. आॅनलाईन तालीमीही केल्या आहेत. त्यामुळे आता लाॅकडाऊन संपल्यानंतर आम्हाला प्रत्यक्षात नाटक रंगभूमीवर आणताना सोपे जाणार आहे. बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे येथील रिहर्सल हॅालमध्ये नाटकाचा मुहूर्त करण्यात आला असून, आता तालीमीही सुरू होणार आहेत.

  प्रिया बेर्डेंची निर्मिती हा योगायोग

  योगायोग म्हणजे सिनेमात ज्यांच्या मुखातील हा संवाद गाजला त्या दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. नाटकाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेबाबत देशपांडे म्हणाले की, हे नाटक नितीन चव्हाण यांनी लिहिलं आहे. प्रियाताईंकडे नाटकाचे स्क्रीप्ट आलं. त्यांना ते आवडलं आणि त्यांनी माझ्याकडे पाठवलं. मलाही खूप आवडलं. त्यामुळे नाटक करायचं ठरलं, पण लॅाकडाऊनमुळे उशीर झाला. माझ्या पद्धतीने नाटकावर थोडे संस्कार केले आहेत. धमाल कॅामेडी नाटक असून, त्यात एक संदेशही दडला आहे. जुन्या जाणत्या कलाकारांच्या बरोबरीने नव्या पिढीतील कलाकारांच्या अभिनयाचा संगम यात अनुभवायला मिळेल. त्यामुळे सर्व वयोगटातील रसिकांना हे नाटक आपलंसं वाटेल.

  अंडरकरंट मेसेज देणार ‘धनंजय माने’

  ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकाच्या संहितेबाबत देशपांडे म्हणाले की, नाटकाची गोष्ट रिव्हील करता येणार नाही. आताच्या पिढीची आई-वडील, नातेवाईकांबाबतची मते काहीशी वेगळी आहेत. आजची पिढी संयुक्त कुटुंबात रहायला तयार होत नाही. प्रत्येकजण सेल्फ सेंटर, स्वार्थी झाला आहे. आपल्यापुरते बघतो आहे. स्वत:पुरते जगतो आहे. यावर भाष्य करणारे हे नाटक आहे. नाती जपणे फार महत्त्वाचे आहे. शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला उभा राहतो हे सध्याच्या काळाने आपल्याला दाखवून दिले आहे. कोणी कुणाचा नाही हे खरे नाही. कोणीतरी कामाला येतोच हे सत्य आहे. एकंदरीत नाती जपा. आई-वडीलांना वृद्ध व्यक्तींना जपा असे हे नाटक सांगते.

  धनंजय माने हे सस्पेंस आहे

  अलीकडच्या काळात ‘ती फुलराणी’नंतर देशपांडे यांनी ‘हिमालयाची सावली’, ‘करायचं काय?’, ‘होते कुरूप वेडे’ ही नाटकं रंगभूमीवर आणली आहेत. देशपांडे यांच्या नाटकाच्या शीर्षकात काही ना काही गमक दडलेलं असतं. या नाटकाच्या शीर्षकाबाबत तसेच व्यक्तिरेखेबाबत ते म्हणाले की, धनंजय माने कोण आहेत हे सस्पेंस आहे. ते नाटक पाहिल्यावरच समजेल. नाटकाला हे शीर्षक मीच दिले आहे. ‘धनंजय माने इथंच राहतात’ या शीर्षकात एक गंमत दडली आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या नाटकातील लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुखातील ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ संवाद आजही रसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. नाटकाच्या शीर्षकाचा सिनेमाशी तसा काही संबंध नाही.

  मराठी रसिक नाटकप्रिय आहे

  लॅाकडाऊननंतर नाटकं ही चालणारच होती, कोरोनानंतर लाईव्ह कलाकृती पाहण्याची गरज वाढली होती. आता जी नाटकं हाऊसफुल होत आहेत ती आॅलरेडी चाललेलीच नाटकं पुन्हा सुरू आहेत. नवीन पहिलं नाटक आमचंच येणार आहे. त्यामुळे नवीन नाटक कसं चालतं ही आमच्यासाठी थोडी रिस्कच असणार आहे. तरीसुद्धा कोरोनानंतरही नाटकाला बुकींग होतंय ही खूप आशादायी आणि सकारात्मक गोष्ट आहे. शेवटी लोकं वेबसिरीज आणि घरात बसून कंटाळली आहेत. मराठी रसिक हा नाटकप्रिय आहे. प्रत्येकाला नाटक पहायचंय, पण आॅड वेळेचा प्रॅाब्लेम असतो. मराठी माणूस नाटक पाहण्याची संधी शोधत असतो असेही देशपांडे म्हणाले.

  अशी आहे मानेंची टीम

  प्रिया बेर्डे, अमर गवळी, सायली गवळी या नाटकाचे निर्माते असून, सूत्रधार गोट्या सावंत आहेत. प्रिया बेर्डेंसह प्रभाकर मोरे, स्वानंदी बेर्डे, चैतन्य सरदेशपांडे, निलंय घैसास, मृगा बोडस, चेतन चावडा या कलाकारांच्या नाटकात भूमिका आहेत. संगीत अमीर हडकर देणार असून, नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. वेशभूषा प्रिया बेर्डे यांची आहे. १९ मार्चला ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.