सुरेखा सिकरी आणि नसरूद्दीन शहा यांचं आहे खास नातं, ‘त्या’ प्रसंगानंतर बदललं त्यांच आयुष्य!

छोट्या पडद्यावर कधी कडक शिस्तीची सासू तर मोठ्या पडद्यावर मायाळू सासूच्या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

    टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ मधल्या ‘दादी सा’ म्हणजेच अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालंय. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज हृदयविकाराने निधन झालं. २०२० सालपासून त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रासही सुरू झाला होता. अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी ७० ते ८० चं दशक आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवलं.

    छोट्या पडद्यावर कधी कडक शिस्तीची सासू तर मोठ्या पडद्यावर मायाळू सासूच्या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अभिनेत्री सुरेखा सिकरी यांना अभिनेत्री नव्हे तर पत्रकार बनायचं होतं. त्याचबरोबर अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत एक अनोखं नातं सुद्धा आहे.

    अभिनेत्री सुरेखा सिकरी या अमरोहा आणि नैनीतालमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. मोठं झाल्यानंतर एक उत्तम पत्रकार बनण्याचं स्वप्न त्यांनी त्यांच्या लहानपणापासूनच पाहिलं होतं. पण कदाचित सुरेखा सिक्री यांच्या नशीबात काही दुसरंच लिहून ठेवलं होतं. अलिगढ मधल्या मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या कॉलेजमध्ये एका नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या नाटकाचं नाव होतं ‘द किंग लियर….’. हे नाटक पाहण्यासाठी सुरेखा सिक्री गेल्या होत्या. या नाटकाला पाहून त्या प्रभावित झाल्या आणि मोठं झाल्यानंतर पत्रकार बनण्याचं ध्येय बाजूला ठेवत अभिनयात करिअर करण्याचा विचार त्यांनी मनात पक्का केला.

    नसरूद्दीन शहा यांच्याबरोबर खास नातं

    बॉलिवूडमधल्या स्टार्सच्या नात्यांबद्दल मोठा गोंधळ असतोच. पण तुम्हाला हे जाणून थोडं आश्चर्य वाटेल, सुरेखा सिकरी या बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या मेव्हणी होत्या. अभिनेते नसरूद्दीन शाह यांना एक मुलगी आहे. हिबा शाहा हीने सुरेखा सिकरी यांच्याच ‘बालिका वधू’ मालिकेत त्यांच्या तरूणपणातील भूमिका साकारली होती.