Ehsan Khan: दिलीपकुमार यांचे कनिष्ठ बंधू एहसान यांचेही कोरोनाने निधन

Ehsan Khan passes away अभिनेता दिलीपकुमार यांच्या कुटुंबाला कोरोना संसर्गाचा मोठा हादरा बसला आहे. आता दिलीपकुमार यांच्या लहान भावाचे मुंबईत कोरोनामुळे निधन झाले आहे.

मुंबई: अभिनेता दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे बंधू एहसान खान (Ehsan Khan) यांचे बुधवारी रात्री ११ वाजता कोरोना (covid-19) संसर्गामुळे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. एहसान यांच्यावर मुंबईतील (mumbai) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. १२ दिवसांपूर्वीच दिलीपकुमार यांचे दुसरे भाऊ अस्लम खान (Aslam Khan) यांचाही कोरोना संसर्गामुळे लीलावती रुग्णालयात मृत्यू झाला होता.

लीलावती रुग्णालयात एहसान खान यांच्यावर डॉ. जलील परकार यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. कोरोनाची लागण त्यात अन्य आजारांची गुंतागुंत यामुळे एहसान यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. एहसान हे दिलीपकुमार यांचे कनिष्ठ बंधू होते.

एहसान खान हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अल्झायमरने त्रस्त होते. कोरोनामुळे गुंतागुंत वाढून त्यातच त्यांचे निधन झाले, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे दिलीपकुमार यांचे दुसरे बंधू अस्लम खान यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे. २१ ऑगस्ट रोजी अस्लम खान यांचे निधन झाले. अस्लम हेसुद्धा लीलावती रुग्णालयातच उपचार घेत होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर करोनामुळेच त्यांना प्राणास मुकावे लागले होते. अस्लम यांच्या निधनानंतर १२ दिवसांत दुसरा भाऊही कोरोनाने गमवावा लागल्याने दिलीपकुमार तसेच त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.