दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा

एफटीआयआयच्या (FTII)अध्यक्षपदी अभिनेता व ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर (,Shekhar Kapur )यांची निवड झाली आहे. याबाबतची घोषणा केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने(Ministry Of Information And Broadcasting)केली आहे. शेखर कपूर यांचा अध्यक्षपदाचा कालावधी ३ मार्च २०२३ पर्यंत असेल असंही जाहीर करण्यात आलं आहे. या आधी निर्माते बी.पी. सिंग FTII चे अध्यक्ष होते. चित्रकृतीमध्ये कलात्मक मूल्य जपणारे आणि संवेदनशील दिग्दर्शक अशी शेखर कपूर यांची ओळख आहे.

शेखर कपूर यांची कारकीर्द
शेखर कपूर यांनी मासूम हा सिनेमा दिग्दर्शित करत हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.त्यांनतर मिस्टर इंडिया हा सिनेमाही दिग्दर्शित केला. बॅंडिट क्वीन हा फूलन देवीच्या आयुष्यावर आधारित सिनेमाही त्यांनी दिग्दर्शित केला या चित्रपटासाठी त्यांना फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. कपूर यांनी भारतीय तसेच आतंरराष्ट्रीय स्तरावर दिग्दर्शकाची भूमिका त्याच ताकदीने पार पडली.आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी एलिझाबेथ चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ऑस्करचे नामांकन मिळाले होते. त्याचबरोबर द फोअर फिदर्स, एलिझाबेथ द गोल्डन एज, न्यूयॉर्क आय लव्ह यू आणि पॅसेज यांसारखे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.शेखर कपूर यांनी टीव्ही मालिकेसाठीही दिग्दर्शन केले असून त्यांनी दिग्दर्शित केलेली खानदान ही मालिका चांगलीच गाजली.२०१३ मध्ये शेखर कपूर यांनी प्रधानमंत्री या टीवी शो होस्ट केलेला.

आगामी प्रोजेक्ट्स
शेखर कपूर हे सध्या एलिझाबेथ सीरिजमधला तिसरा पार्ट तयार करत आहेत. एलिझाबेथ द डार्क एज असं या सिनेमाचं नाव आहे.