दिग्दर्शक समीर विद्वांस कार्तिक आर्यनला घेऊन करतोय चित्रपट, पण ‘या’ कारणास्तव सिनेमाच्या नावात केला बदल

समीरच्या या चित्रपटात बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे.

    चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस. काही दिवसांपूर्वीच समीरने ‘सत्यनारायण की कथा’ या नव्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण आता या चित्रपटाचे नाव बदलण्यात आलं आहे.

     

    समीर विद्वांसने ट्वीट करत आगामी चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’चे नाव बदलणार असल्याचे सांगितले आहे. “कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही आगामी चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या नावामुळे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. निर्मात्यांनी आणि क्रिएटीव्ह टीमने यासाठी पाठींबा दिला आहे. या चित्रपटाच्या नव्या नवाची घोषणा लवकरच करण्यात येईल” या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.

    समीरच्या या चित्रपटात बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.