‘जून’ चित्रपटाच्या निमित्ताने सुहृदनं केलंय वेगळा विषय मांडण्याचं धाडस!

'जून' हा चित्रपट प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सुहृदनं 'नवराष्ट्र'शी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.

  ‘पुणे ५२’, ‘तु्ह्या धर्म कोंचा?’, ‘बाजी’ यांसारख्या वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांची निर्मिती करणारा निर्माता सुहृद गोडबोले दिग्दर्शनाकडे वळला आहे. सुहृदनं वैभव खिस्तीच्या साथीनं ‘जून’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘जून’ प्लॅनेट मराठीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सुहृदनं ‘नवराष्ट्र’शी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.

  सिनेनिर्मितीकडून दिग्दर्शनाकडे वळण्याबाबत सुहृद म्हणाला की, बरीच वर्षे निर्माता म्हणून काम केलं असलं तरी दिग्दर्शन करण्याचं उराशी बाळगलं स्वप्न होतंच. दिग्दर्शन करणं हा एक वेगळाच अनुभव असतो. वेगळी प्रोसेस असते. सेटवर कितीही वर्षे काढलेली असली तरी दिग्दर्शन करणं ही एक जबाबदारी असते. ती कोणालाही शिकवता येत नाही. ती स्वत: चूका करत किंवा अनुभवातून शिकायची असते. सर्व शिकून झाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जेव्हा एखाद्या लेखकानं लिहिलेली गोष्ट मांडताना त्यातील विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं असतं. त्यांच्यापर्यंत कथेतील भावना पोहोचवायच्या असतात. आपण पटकथेला न्याय दिल्यावर एक वेगळंच समाधान लाभतं. आज ज्याप्रकारे पॅाझिटीव्ह प्रतिक्रिया येत आहेत ते पाहून ‘जून’ बनवल्याचं समाधान मिळत आहे.

  ‘जून’च्या प्रोसेसबाबत सुहृद म्हणाला की, २०१९ मध्ये जेव्हा या चित्रपटाच्या प्रोसेसची सुरुवात झाली, तेव्हा मी आणि निखिल महाजन एकत्र भेटलो. आमची फार जुनी मैत्री आहे. निखिलचा ‘पुणे ५२’ हा चित्रपट मीच प्रोड्यूस केला आहे. माझ्या डोक्यात एक विचार आला होता तो मी त्याला सांगितला. त्याचवेळी नेहा पेंडसेला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. कारण तिनं खूप वर्षे मराठीत काम केलं नव्हतं आणि वेगळ्या प्रकारच्ं काम तिला करायचं होतं. वैभव खिस्ती आणि मी मागील बऱ्याच वर्षांपासून एकत्र काम करतोय. त्याने माझ्या सर्वच चित्रपटात असोसिएट म्हणून काम केलं आहे. असे एकेक जण एकत्र येत गेलो. आम्हा सर्वांना ‘जून’ची गोष्ट आवडली. असोसिएट डायरेक्टर रोहित सातपुते, एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर स्वप्नील भंगाळे आम्ही नेहमीच एकत्र काम केलं आहे. त्यामुळं मित्रा मित्रांनीच मिळून ‘जून’ बनवला. शाल्मलीनं पहिलं मराठी गाणं ‘पुणे ५२’साठी गायलं आहे. त्यामुळं तिच्यासोबत काम केलं आहे. सिनेमाला एका वेगळ्या प्रकारच्या म्युझिकची गरज होती. तिनं केलेल्या म्युझिकमध्ये नावीन्य आहे.

  कुटुंब रंगलंय मनोरंजनात

  माझे वडील श्रीरंग गोडबोले लेखक, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार असल्यानं मी नाटकाच्या वातावरणातच लहानाचा मोठा झालोय. पुण्यासारख्या शहरात वाढल्याचाही फायदा झाला. सिनेमा-नाटकांना एक्सपोजर होतं. त्याचा कुठेतरी कळत-नकळत फायदा होत असल्याचं आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवतं. बालपणापासून कलेशी निगडीत झालेले संस्कार कामी येतात आणि दिसतातही. बाबांनी कधी मला असं करायचं किंवा तसं करायचं असं हात धरून शिकवलं नाही, पण त्यांची काम करण्याची पद्धत पाहून, ते लोकांशी ज्याप्रकारे वागायचे, बोलायचे, लिहायचे त्याचं निरीक्षण करत मोठा झाल्यानं त्यांचा प्रभाव माझ्यावर खूप आहे. बहिण मृण्मयी, बायको गिरीजाही अभिनेत्री आहे. त्यामुळं आम्हा सर्वांना या इंडस्ट्रीबाबत ठाऊक आहे. मनोरंजन विश्वातील सारं काही किती अनप्रेडीक्टेबल आहे हे सर्वांना ठाऊक आहे, पण हे समजून घेणारी माणसं माझ्या सोबत असल्यानं स्वत:ला लकी मानतो. या सर्व प्रवासामध्ये गिरीजाचा मला सर्वात मोठा पाठींबा आहे. ती सोबत असल्यानं बऱ्याच गोष्टींमध्ये मानसिक साथ लाभली.

  कोणत्याही चौकटीत अडकायचं नाही

  आम्ही ठरवून काहीच केलेलं नाही. एक व्यक्ती म्हणून मला नेहमीच काही गोष्टी आकर्षित करत आल्या आहेत. ‘जून’सारखाच चित्रपट करायचा हे मी ठरवून केलेलं नाही. जर मला एखादा कॅामेडी चित्रपट करावासा वाटला असतं तर तो चित्रपट निवडला असता. थ्रिलरपट बनवावासा वाटला असता तर तशा प्रकारचा चित्रपट केला असता. मार्केटमध्ये काय सुरू आहे, ट्रेंड काय आहे हे पाहण्यापेक्षा तुम्हाला जी गोष्ट सांगायचीय ती करायला हवी. मग तो जॅानर कोणताही असो. अगदी निर्माता म्हणून मी जे निर्णय घेतले, तेव्हा नेहमीच प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं चित्र दाखवणारे चित्रपट होते. त्यावेळीही कधीच ठरवलं नव्हतं. जर नेहमी वेगळ्याच प्रकारच्या गोष्टी आकर्षित करत असतील तर काय करणार… आता यानंतर लाईट हार्टेट किंवा कॅामेडी चित्रपट करायलाही आवडेल, पण गोष्ट भावली पाहिजे. मला स्वत:ला अमूक एक चौकटीत अडकायचं नाही.

  कथानकाची गरज होती म्हणून…

  कॅरेक्टर्सची डिमांड तशी होती म्हणून नेहा आणि सिद्धार्थ मेनन या दोन कलाकारांची निवड केली. गोष्टीतील दोन्ही मुख्य कॅरेक्टर्स एका वयाचे नाहीत. ही टिपीकल रोमँटिक पेअर नाही. ते प्रेमाकरता एकत्र आलेले नसून, एका वेगळ्या कारणामुळं एकत्र आले आहेत. त्या गरजेनुसार कास्टिंग करण्यात आलं. नेहा अगोदरच आमच्या टीममध्ये होतीच. सिद्धार्थकडे एक बॅाईश चार्म आहे. त्या वयातील तो वाटतो. उत्तम अभिनेता आहे. त्यामुळं दोघं योग्य वाटले. ठरवून काही केलं नाही. कॅरेक्टरसाठी जे आवश्यक होते ते कलाकार निवडले. रोहन मापुसकर कास्टिंग डायरेक्टर म्हणून आल्यावर त्यानं औरंगाबादमध्ये जाऊन तिथे कास्टिंग केलं.

  प्रत्येक लहान शहरातील गोष्ट

  चित्रपटाचा लेखक निखील महाजन औरंगाबादचा आहे. तो ज्या सोसायटीत वाढला. त्याला जे अनुभव आले, त्या अनुभवातून लिहिलेली ही गोष्ट आहे. आम्ही या चित्रपटाचं शूटिंगही त्याच सोसायटीत केलं आहे. ही गोष्ट लहान शहरात घडणारी आहे. पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील गोष्टच नव्हती. औरंगाबाद हे लहान शहर आहे. त्यामुळं सर्व गोष्टी जुळून आल्या. वैभव स्वत: अहमदनगरचा आहे. त्यामुळं त्यालाही लहान शहरात लहानाचा मोठा झाल्याचा अनुभव आहे. पटकथेत लहान शहरातील गोष्ट असल्यानं औरंगाबादची निवड करण्यात आली. ही गोष्ट प्रत्येक लहान शहरातील आहे. औरंगाबाद फक्त त्याचं प्रतिनिधीत्व करत आहे. आपल्याकडे खूप विषय बोलले जात नाहीत. टाळले जातात. पालक आणि मुलांमध्ये किंवा एकमेकांमध्ये संवाद होत नाही. तो संवाद व्हायला हवा. कारण आता आपण कोरोनाच्या विचित्र काळात जगतोय. यातून बाहेर पडण्यासाठी संवाद होणं गरजेचं आहे. ही गोष्ट सामान्य लोकांची आहे. हा चित्रपट लहान शहरांमधील इश्यू मांडणारा आहे. त्यांच्या मनातील न्यूनगंडावर प्रकाश टाकणारा आहे. ज्या विषयावर बोललं जात नाही त्यावर बोलायचं थोडंसं धाडस केलंय.