‘माझं शरीर..माझी अब्रू.. आणि तुमची….’ , चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीची सणसणीत चपराक!

दिव्यांकाच्या या उत्तरानंतर तिचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

    अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे लाखो चाहते आहेत. आपल्या अभिनयाने दिव्यांकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. दिव्यांकाने मालिकासह अनेक रिअलिटी शोमध्ये देखील काम केलं आहे. सोशल मीडियावरही दिव्यांकाचे लाखो चाहते आहेत. मात्र अनेकदा सोशल मीडियावर दिव्यांकाला ट्रोल व्हावं लागलं आहे. मात्र या ट्रोलर्सना दिव्यांकाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

    एका युजरने दिव्यांकाला ‘क्राईम पेट्रोल’ या शोमधील तिच्या लूकवरून ट्रोल केलंय. “क्राईम पेट्रोल सतर्क: वुमन अगेन्स्ट क्राईम” या विशेष भागात दिव्यांका त्रिपाठी सूत्रसंचालकाची भूमिका बजावतेय. यावरून एका नेटकऱ्याने दिव्यांकाला ट्विटरवर प्रश्न विचारला. “क्राईम पेट्रोल शोच्या एपिसोडमध्ये तुम्ही ओढणी का घेत नाहीस?” असा प्रश्न नेटकऱ्याने केला. यावर दिव्यांकाने सणसणीत उत्तर देत युजरची बोलती बंद केली.

    दिव्यांका म्हणाली, ” ओढणी न घेतलेल्या मुलींकडे देखील तुमच्या सारख्यांना आदराने पाहण्याची सवय व्हावी यासाठी. महिलांच्या पेहरावाची निंदा करण्याऐवजी कृपया तुमची आणि आसपासच्या मुलांची नियत सुधारा..”माझं शरीर..माझी अब्रू..माझी मर्जी, तुमची सभ्यता…तुमची मर्जी” असं उत्तर देत दिव्यांकाने युजरला चपराक लगावली आहे. दिव्यांकाच्या या उत्तरानंतर तिचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.