खरंच कलाकारांनी जीवावर उदार होऊन मनोरंजन करणं गरजेचं आहे का?, परराज्यात सुरू असणाऱ्या शुटींगवर प्रेक्षक नाराज!

कोणीतरी म्हटलं की, 'जेवायला मिळालं तर कलाकार जीवंत राहतील. पैसाच नसेल तर काय करणार लोक... त्रासलेत सगळे घरात बसून... उपाशी मरण्यापेक्षा खाऊन पिऊन मेलेलं बरं...' या युक्तीवादावर रसिकच काय तर कोणीही काहीच बोलू शकणार नाही.

  प्रत्येक कायद्याला पळवाट असते, पण ती पळवाट जर जीवावर बेतणारी असेल तर काय उपयोगाची? हेसुद्धा तितकंच खरं आहे. महाराष्ट्रात सध्या १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. लॅाकडाऊन असल्यानं शूटिंगला परवानगी नाही. त्यामुळं काही मालिकांच्या वऱ्हाडांनी परराज्यांमध्ये मुक्काम ठोकला आहे. गोवा, दमण, सिल्वासा, जयपूर, बेळगाव, अहमदाबाद या ठिकाणी सध्या काही मराठी मालिकांचं शूट सुरू आहे. काही कलाकारांनी परराज्यात जात असल्याचे विमानतळावरील, विमानातील, गाडीतील, लोकेशनवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपण ‘हे सर्व रसिकांच्या मनोरंजनासाठी’ करत असल्याचं म्हटलं आहे. त्यावर रसिकांनी मात्र त्यांना ‘कलाकारांच्या जीवाचं मोल देऊन आम्हाला मनोरंजन नको’, असं सांगितलं आहे. यावरून रसिक आणि काही कलाकार-तंत्रज्ञांमध्ये चर्चा रंगल्याचं पहायला मिळत आहे. या सर्वांमध्ये एक प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो, तो म्हणजे ‘खरंच कलाकारांनी जीवावर उदार होऊन मनोरंजन करणं गरजेचं आहे का?’

  ‘शो मस्ट गो आॅन’ असं म्हणत मनोरंजन विश्वानं नेहमीच मनोरंजनाचा वसा जपला आहे. कितीही वादळं आली तरी मनोरंजनाची नौका कधीच थांबलेली नाही. कित्येक कलाकारांनी वैयक्तिक जीवनात अडचणी येऊनही चेहऱ्याला रंग लावत रसिक मायबापाचं मनोरंजन केलं आहे. असं असलं तरी सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे. कोरोनाचं सावट अद्याप दूर झालेलं नसून, दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत आहे. कोरोनाचं चक्रव्यूह सर्वसामान्यांसोबत सेलिब्रिटींनाही आपल्या जाळ्यात ओढत आहे. एका मागोमाग एक अपघात व्हावा तशा कोरोनाग्रस्त झालेल्या सेलिब्रिटी रसिकांना सोडून जात असताना काही मालिकांची युनिट्स मात्र परराज्यात जाऊन मनोरंजनाचा वसा जपण्यात दंग आहे. आम्ही हे सर्व रसिकांच्या प्रेमाखातर करत आहोत असं सांगणाऱ्या कलाकारांना ‘आम्हाला मनोरंजन नको, कलाकार हवेत’, असं रसिकही सांगू लागले आहेत.

  एका कलाकारानं शूटिंगसाठी गोव्याला जात असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत ‘हा प्रवास आम्ही करतोय तो फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनचा प्रवास खंडीत न होता, अजून मनोरंजक व्हावा म्हणून… सर्व प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम राहू दे. आम्ही आमची काळजी घेऊच… तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या’, असं लिहीलं आहे. त्यावर सर्वसामान्य रसिकानं पोटतिडकीनं लिहीलं की, ‘शूटिंगपेक्षा तुमच्या सर्वांची जास्त गरज तुमच्या घरच्यांसाठी आहे. काही दिवस आम्ही टीव्ही नाही बघितला, तर काही होणार नाही. तुमच्यासारख्या गोड माणसांची आम्हालाही खूप गरज आहे. तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या’. अन्य एका चाहत्यानं लिहीलं की, ‘हे कलाकार आपल्यासाठी काम करतात. भले यांना याचे पैसे मिळत असतील, पण यांना काय झालं तर… याचाही विचार करा.’ रसिकांनी केवळ कलाकारांच्या प्रेमापोटी आपल्या मनातील भावना सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. याचा काहींनी मात्र उलटा अर्थ काढत काहीसा वेगळाच युक्तीवाद केला आहे. कोणीतरी म्हटलं की, ‘जेवायला मिळालं तर कलाकार जीवंत राहतील. पैसाच नसेल तर काय करणार लोक… त्रासलेत सगळे घरात बसून… उपाशी मरण्यापेक्षा खाऊन पिऊन मेलेलं बरं…’ या युक्तीवादावर रसिकच काय तर कोणीही काहीच बोलू शकणार नाही.

  आज थोड्याफार फरकानं सर्वांचीच परिस्थिती सारखी आहे. सर्वसामान्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यांच्या आहेत त्यांना कमी पगारात काम करावं लागत आहे, व्यापाऱ्यांची दुकानं बंद आहेत, हातावर पोट असणाऱ्या मजूर घरी बसले आहेत. यांनाही दोन वेळ्च्या भाकरीची भ्रांत आहेच. ग्लॅमरच्या झगमगाटात जीवन जगणारे कलाकारच जर ‘उपाशी राहण्याचा’चा सूर आळवू लागले, तर मोलमजूरी करून कुटुंबाचं पालणपोषण करणाऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडं बघायचं. त्यांना कोण वाली आहे? लहान-सहान भूमिका साकारणारे कलाकार, पडद्यामागचे तंत्रज्ञ, स्पॅाट बॅाय यांच्यासाठी लॅाकडाऊन सोपा नाही हे मान्य असलं तरी जीवावर उदार होऊन जरी दोन वेळची भाकरी मिळवली आणि त्यात काही दगाफटका झाला तर त्यांच्या कुटुंबियांनीही काय करायचं? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

  मनोरंजन ही माणसाची मूलभूत गरज नाही. त्यामुळं कलाकारांच्या जीवाची काळजी घेत काही मालिकांनी शूट पूर्णपणे थांबवलं आहे. टीआरपीच्या स्पर्धेत आपण मागं राहू नये म्हणून काही मालिका मात्र आगीशी खेळत आहेत. आजवर बऱ्याच कलाकारांचा कोरोनानं बळी घेतला आहे. आशालता वाबगावकरांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्री गेल्या. किशोर नांदलस्कर हे अलीकडचं ताजं उदाहरण आहे. श्रवण राठोड हे जरी कुंभ मेळ्यामुळं कोरोनाग्रस्त होऊन गेले असले तरी शेवटी कोरोनाचेच बळी ठरले आहेत. अशोक शिंदेंसारखे फिटनेसबाबत सजग असणारे कलाकारही मालिकेच्या सेटवरच कोरोनाबाधित झाले. हॅास्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला. त्यामुळं प्रत्येक कलाकार-तंत्रज्ञानं योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या जिथं शूट सुरू आहे, तिथंही कोरोना आहेच. कोरोनानं संपूर्ण जग व्यापलं आहे. एव्हरेस्टसारख्या शिखरावर जिथं कोरोना पोहोचलाय, तिथं इतर ठिकाणांबाबत काय बोलायचं? गोवा, दमण, अहमदाबाद, जयपूर, सिल्वासा इथंही कोरोना आहे. आपला आवडता एखादा कलाकार गेला की एखाद्या चाहत्याला जे दु:ख होतं ते इतर कोणीही फिल करू शकत नाही. सुशांत सिंग राजपूत गेल्यावर बऱ्याच चाहत्यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला हे विसरून चालणार नाही. त्यामुळंच रसिकही अत्यंत पोटतिडकीनं आणि कलाकारांच्या काळजीनं सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत यांचं भान राखून कलाकारांनीही समजून घेणं गरजेचं आहे.

  उतावीळ होऊ नका : अशोक शिंदे

  परराज्यात जाऊन मालिकांचं शूटिंग करण्याइतकं उतावीळ होण्यात काही अर्थ नाही. मागच्या वर्षी आपण शूट केलं नव्हतंच. आता परिस्थिती गंभीर आहे. ती हाताबाहेर जाण्यापूर्वी थांबायला हवं. मनोरंजन हे सर्वात शेवटी येतं. मनोरंजन हा माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न नाही. आता मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांची म्हणावी तितकी वाईट परिस्थिती नाही. शंभरातील तीन ते पाच टक्के लोकांनाच जर दररोज पैसे मिळाले नाहीत, तर त्यांचा प्रॅाब्लेम होईल. सर्वांची परिस्थिती मात्र तशी नाही. सरकारनं केवळ आठ दिवसांचा लॅाकडाऊन सांगितला आहे. यासाठी अख्खा सेटअप घेऊन आपण परगावी जातोय, पण तिथं गेल्यावर जर एखादा कलाकार किंवा तंत्रज्ञ इन्फेक्टेड झाला तर किती मोठा प्रॅाब्लेम होऊ शकतो याचा विचार करायला हवा. तिथं तुम्हाला कोण बघणार? त्यानंतर शूटिंग थांबणारच ना. त्यामुळं आता थांबलं तर काय हरकत आहे. मी हे स्वानुभवातून सांगत आहे. त्यामुळं कोणीही वाईट घेऊ नये. मी जे भोगलंय ते माझ्या मित्रांच्या, माझ्या सहकाऱ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून सांगतोय. महिन्याभरानं परिस्थिती निवळेल. त्यानंतर करूया की शूटिंग… काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.