ध्यान चंद यांच्यावरील बायोपीकवरील संकटात वाढ, वरूण धवनने दिला काम करायला नकार कारण…

या कॅरेक्टरसाठी आवश्यक असणारी तयारी करण्यासाठी आणि नंतर शूटसाठी बराच वेळ लागणार असल्यानं वरुणनं ही आॅफर नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    आपल्या बहारदार खेळाच्या बळावर देश-विेदेशातील हॅाकीची मैदानं गाजवणाऱ्या मेजर ध्यान चंद यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. मागील एका दशकापासून नाना तऱ्हेच्या संकटांमुळं ध्यान चंद यांच्यावरील बायोपीकला गती मिळू शकलेली नाही. आता या चित्रपटाला पुन्हा एक नवीन टेन्शन सतावू लागलं आहे.

     काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी वरुण धवनशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली होती. वरुणला स्क्रीप्ट आणि चित्रपटाचा पूर्ण प्लॅाट आवडला होता. लॅाकडाऊननंतर लगेचच शूट सुरू करण्याचा प्रोडक्शन हाऊसचा मानस आहे, पण वरुणनं पूर्वीच या तारखा अन्य चित्रपटांना दिलेल्या असल्यानं घोळ झाला आहे. या कॅरेक्टरसाठी आवश्यक असणारी तयारी करण्यासाठी आणि नंतर शूटसाठी बराच वेळ लागणार असल्यानं वरुणनं ही आॅफर नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    या चित्रपटाचं पटकथालेखन सुप्रतिक सेन यांनी केलं असून, अभिषेक चौबे दिग्दर्शन करत आहेत. वरुणकडे सध्या ‘जुग जुग जिओ’, ‘भेडीया’, ‘सनकी’ आणि ‘इक्कीस’ हे चार चित्रपट आहेत. पूर्वी जेव्हा करण जोहरनं या चित्रपटाचे हक्क घेतले होते, तेव्हा शाहरुख खान टायटल रोल साकारणार असल्याची चर्चा होती.