मी सिंहगड बोलतोय…

पुण्याजवळचा सिंहगड किल्ला हा रसिकांशी संवाद साधून गडावरल्या कथांना उजाळा देतो. या किल्ल्याचं मूळ नाव कोंढाणा. एकेकाळी महादेव कोळींच्या ताब्यात हा किल्ला होता.

  – संजय डहाळे

  या किल्ल्यावर नरवीरांनी भगवा झेंडा फडकविला. रक्त सांडलं त्यांनी म्हणूनी आम्हा सुखाचा दिन दिसला. नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणार्पण करून हा गड जिंकला. दिनांक ४ फेब्रुवारी १६७०. त्यानंतर स्वातंत्र्ययोद्धा नावजी लखमाजी बलकावडे यांनी त्याच तऱ्हेनं हा गड जिंकला. दिनांक १ जुलै १६९३ आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी याच किल्ल्यावर आपला देह ठेवला दिनांक ३ मार्च १७००’

  अस्पष्ट कोरलेले शब्द शौर्याची गाथा उलगडतात. थरारक प्रसंग जागे होतात. आज एक काळ उलटला. चक्क ३५१ वर्षे झाली, पण तेजस्वी शिवकाळ आजही या परिसरात संचारतोय. महाराष्ट्राचा इतिहास नाट्यरूप घेतोय. चित्रकार, नेपथ्यकार, कलाकार असलेले विजय खानविलकर यांनी करोनाकाळापूर्वी एका नाट्यपूर्ण आविष्काराला रंगमंचावर आकार दिला होता. त्यानंतरच्या करोनाच्या बंदीकाळातही दहिसर परिसरात काही त्याचे प्रयोग झाले. ज्याचं वर्णन ‘मी सिंहगड बोलतोय…’ असं करणं हे सर्वार्थानं योग्य ठरेल. शिवकाळावरला हा एकपात्री एकेक शिवकालीन गडावर त्यांनी बेतलेला असून, त्याभोवतीच्या थरारक, हृदययस्पर्शी घटनांची मालिकाच गुंफली आहे. पूर्ण गेटअपमध्ये आणि किल्ल्याच्या देखण्या व वास्तववादी नेपथ्यावर हे नाट्य साकार करण्यात येतंय. त्याचा प्रारंभीचा किल्ला आहे. सिंहगड!

  पुण्याजवळचा सिंहगड किल्ला हा रसिकांशी संवाद साधून गडावरल्या कथांना उजाळा देतो. या किल्ल्याचं मूळ नाव कोंढाणा. एकेकाळी महादेव कोळींच्या ताब्यात हा किल्ला होता. कौंडण्यऋषींनी इथंच तपश्चर्या केल्याची पुराणकथा आहे. शिवकाळात तानाजी मालुसरे यांनी लढत देऊन आपलं बलिदान दिलं. हे कळताच शिवप्रभूंनी ‘गड आला पण सिंह गेला…’ हे उद्गार काढले. आजही हृदय हेलावून सोडणारा हा प्रसंग. याच किल्ल्यावर तानाजी कडा आणि स्मारक उभं आहे. दारुचं कोठार, टिळक-गांधी यांची भेट झालेला टिळकबंगला, कोंढाणेश्वर हे शंकराचं मंदिर, कोळ्यांचं दैवत अमृतेश्वर भैरव मंदिर, देवकडा, कल्याण दरवाजा – या सर्वांभोवती संदर्भ, कथा आहेत, शिवकाळ आहे आणि तो नव्या पिढीपुढं नाट्यरूपात मांडण्याचा रंगकर्मी खानविलकर यांचा प्रयत्न आहे. जो पदोपदी थक्क करून सोडतो. रंगभूषा व वेशभूषेसह ज्येष्ठ शिलेदाराची देहबोली, सिंहगड किल्ल्याचा आभास निर्माण करणारं नेपथ्य आणि अभिनयासह अभिवाचनाचं सामर्थ्य – यातून हे नाट्य रंगतदार होतं. शिवजयंती आणि शाळेतल्या उत्सवांमध्ये आजवर याचे काही प्रयोग झालेत. त्याला उदंड प्रतिसाद मिळालाय. करोना काळामुळं याच्या प्रयोगांवर बंधनं जरी आली असली तरी हा हाडाचा कलाकार शांत बसलेला नाही. उपलब्ध वेळ व सामुग्रीत पूर्ण नियमांचं पालन करून शिवदुर्गकथांचे प्रयोग करीतच आहेत. त्यामागं शिवदुर्गावरील असणारी श्रद्धा ही मोलाची आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटामुळं या किल्ल्याविषयी काहींचं कुतूहल जागं झालंय, पर्यटक वाढले आहेत हे खरंय.

  या प्रयोगाचा प्रारंभच लक्षवेधी ठरतो अंधारात अचानक वीजांचा कडकडाट, वादळी वारे, भूकंपाचे हादरे आणि एका बुरुजातून प्रगटणारा शिलेदार म्हणतोय ‘होय! मी सिंहगड बोलतोय…’ आणि दिड एक तास ताकदीनं संवाद साधला जातो. त्यात नाट्य आहे. प्रसंग आहेत. भव्यता आहे. प्रकाश आणि संगीताची सोबत आहे. मनोगत मांडता-मांडता आपण सारे सिंहगडाच्या भूतकाळात पोहचतो आणि वर्तमानात परतताना ‘गड-किल्ले’ याचा बाजार मांडू नका. पिकनिक स्पॉट म्हणून बघू नका. स्वच्छता राखा. त्याचं पावित्र्य पाळा!’ असा संदेशही देण्यात येतो, आणि पडदा पडतो…

  महाराष्ट्रात ३५० किल्ले आहेत, पण काळाच्या ओघात अनेक भग्नावस्थेत दिसताहेत. तिथले बुरुज, तट, मंदिरं, मूर्त्या, दरवाजे, जलाशय याची दुर्दशा झालीय. हा एक ऐतिहासिक ठेवा असून, त्याची जपणूक करण्यासाठी सर्वांचेच प्रामाणिक प्रयत्न जरुरीचे आहेत, हेच या प्रयोगातून ठासून मांडलंय. याचा निर्मितीखर्च हा पेलविण्याचा तसेच शाळा-कॉलेजांतून याचे प्रयोग करण्याचा खानविलकर मित्रमंडळाचा प्रयत्न जरूर आहे, पण गेल्या दोन वर्षात सारं काही थंडावलंय. याची खंत त्यांना आहे. पुढल्या सादरीकरणाच्या प्रतिक्षेत सारे जण आहेत.

  प्रेरणादायी संस्काराचा हा अल्पसा प्रयोग व प्रयत्न असून, त्यामागील भावना जाणून घ्या. कारण आपण जर भूतकाळ विसरलो, तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही! असंही रंगकर्मी विजय खानविलकर यांनी समारोपात सांगितलं. जे खूप काही सांगून जातं. ‘आता पुढला किल्ला कुठला?’ हा एका तरुण रसिकाचा प्रश्न. जो प्रयोगानंतर विचारला गेलाय तो बोलका आहे. आशादायी आहे.