नागपूरच्या रंगयोद्धांना सलाम!

नाट्यगृहाचा पडदा जरी आज बंद असला तरीही फेसबूकच्या माध्यमातून किंवा सारे नियम पाळून स्टेज शो ही त्यांनी केले. एक प्रामाणिक नाट्यचळवळ त्यांनी चालविली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद हा साऱ्यांकडून मिळतोय.

    संजय डहाळे

    नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे हे विदर्भातील प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गेली चाळीस एक वर्षे सक्रीय आहेत. राज्यनाट्यस्पर्धेत ‘नागपूरचं नाटक’ म्हटलं की संजय भाकरे हे हमखास असणारच, असं समीकरणच बनलं आहे. आज कोरोनाच्या संकटकाळात रंगकर्मींना आपला छंद, हौस ही जोपासून आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘दरमहा एक एकांकिकेचा प्रयोग’ ही अभिनव संकल्पना त्यांनी राबविली. सोबतच नाट्यअभिवाचन, एकांकिका उत्सव, नाट्यवर्ग असेही उपक्रम त्यांनी हाती घेतले. नाट्यगृहाचा पडदा जरी आज बंद असला तरीही फेसबूकच्या माध्यमातून किंवा सारे नियम पाळून स्टेज शो ही त्यांनी केले. एक प्रामाणिक नाट्यचळवळ त्यांनी चालविली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद हा साऱ्यांकडून मिळतोय.
    संजय भाकरे यांनी नाटकवाल्यांसाठी हक्काचं व्यासपिठ असावं, यासाठी एक फाऊंडेशन स्थापन केलंय. त्याच बॅनरखाली वर्षभर नाट्य उपक्रम हे सुरू असतात. एकांकिकाकार सागर देशमुख लिखित आणि संजय भाकरे दिग्दर्शित ‘तळ्यात-मळ्यात’ या नाट्याचा प्रयोग रंगमंचावर करण्यात आला. तो गाजला. सम्राज्ञी वैद्य आणि सचिन गिरी हे दोन कलाकार. दोघेही पूर्ण तयारीचे. तालमी चांगल्या झाल्यामुळे प्रयोगात एक सहजता आलेली. हृदयस्पर्शी संवाद आणि दोघांची समर्पक देहबोली. प्रेम, बोलणी, लग्न, जगणं – यावर गुंतलेलं आजच्या तरुणाईचं दर्शनच त्यातून दिसलं. दिग्दर्शकाने दिलेली ट्रीटमेंट विलक्षणच. नेपथ्य – प्रकाश आणि साऱ्या तांत्रिक बाजूही उत्तम सांभाळल्या होत्या. ऋषभ घापोडकर, केयुर भाकरे, अभिजित कुंभारकर, आदित्य धळघुळे, सुयश गोखले. ही ‘टिम’ सज्ज होती. प्रयोग चांगला रंगला.
    तळ्यात-मळ्यात या प्रयोगाला एकांकिका महोत्सवाचे निमित्त होतं. कोरोना काळातले कडक निर्बंध जरी असले तरी रसिकांनी या आणि सोबतच्या पाच एकांकिकांना चांगला प्रतिसाद दिला. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेचेही याला सहाय्य लाभले. हा महोत्सव बहारदार आविष्काराला मोकळी वाट करून देणारा होता. अशा उपक्रमांमुळे कोंडलेल्या अभिव्यक्तीला हक्काचे व्यासपीठच मिळाले. याचा अनुभव अनेकांनी घेतला.
    आणखीन एक ‘नाट्यरंग’ म्हणजे कादंबरीकार योगीराज बागूल यांच्या कादंबरीवर आधारित ‘विठाई’चे करण्यात आलेले नाट्यपूर्ण अभिवाचन. कथा, काव्य, कादंबरी याची नाटके आजवर झालीत. त्याच वाटेवर बागूलांच्या कादंबरीवर नाट्यपूर्ण अभिवाचन करून त्यातील ‘नाट्य’ नेमकं टिपण्याचा प्रयत्न या सादरीकरणातून झाला. कादंबरीकार बागूल यांच्या जीवनातला संघर्ष हा त्यांच्या कादंबरीतल्या व्यक्तिरेखातून ठळकपणे नजरेत येतो. त्यांची अनेक पुस्तके ही साहित्याच्या अभ्यासक्रमासाठी लावण्यात आली आहेत. प्रिय रामू, पाचट, ही वाट सुनसान कशी?, तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा, इत्यादी पुस्तके संग्राह्य आहेत. खेडोपाड्यातलं, गावाकुसाबाहेरचं जीणं त्यांच्या लेखनातून प्रामुख्याने डोकावते. ‘विठाई’चे अभिवाचन ही मनाला भिडते.
    कुरुक्षेत्र, बोन्साय, कॉल मी कॅप्टन रॉबर्ट, आज अचानक, केस नं. ९९, रूपक, बाप हा बापच असतो, अनिमा – अशी अनेक पूर्ण नाटके भाकरे यांच्या नावावर जमा आहेत. एक समर्थ दिग्दर्शक – निर्माता – अभिनेता म्हणून त्यांनी राज्यनाट्य स्पर्धा गाजविल्या. पथनाट्य, गच्चीनाट्य यातून अनेक रसिकांशी त्यांनी आजवर संवाद साधलाय. नागपूर आणि परिसरातल्या उदंड जनसंपर्कामुळे करोना जागृतीसाठीही त्यांनी प्रयत्न केलेत. हजारो संहितांचा संग्रह असलेले एक वाचनालयही त्यांनी उभं केलय. त्यांच्या रंगचळवळीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष असते.
    कोरोनाचे महासंकट सगळीकडे कोसळले आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत. माणसं निस्तेज बनली. दिवसेंदिवस यातून सुटकेपेक्षा ते अधिकच भयानक रूप धारण करतांना दिसत आहे. अशा वेळी नागपूर मुक्कामी एक रंगकर्मी नाट्य या माध्यमातून साऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करतोय. कुटुंब, वस्ती, शहर यातल्या घुसमटीतून काही प्रमाणात का होईना बाहेर काढण्याचा अभिनव प्रयत्न आहे. रंजन, अंजन, प्रशिक्षण देण्याचा हा त्यांचा ‘तळ्यात-मळ्यात’ ते ‘विठाई’चा प्रयोग खरोखरच आदर्श म्हणावा लागेल. या रंगयोद्धांना सलाम!

    एकांकिका / अभिवाचन
    दिग्दर्शन व मार्गदर्शन – संजय भाकरे
    निर्मिती – अनिता भाकरे
    सूत्रधार – शेखर मंगलमूर्ती
    सहाय्यक – राखी वैद्य
    निर्मिती – संजय भाकरे प्रॉडक्शन