मनोरंजनाचा ‘खुळखूळा’ डोस!

  – संजय डहाळे

  व. पु. काळे यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की, ‘माणसाला काही ना काहीतरी छंद हवा, स्वप्न हवीत, पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी, त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो आणि सापडवायलाही शिकतो!’ आणि गेली दोन एक वर्षे आपण सारेजण ज्या संकटातून जात आहोत, त्यातून बरंच काही हरवलं आणि खूप काही शिकवलं गेलंय…
  अर्थात याचं निमित्त आहे, नाटककार, संगीतकार आणि नकलाकार असलेले रत्नाकर पिळणकर यांच्या ‘खुळखूळा’ या भन्नाट एकपात्री कार्यक्रमाचं. हा एकपात्री त्यांचा छंद आहे. स्वप्न आहे. पण याही परिस्थितीत मिळेल त्या माध्यमातून त्याचे प्रयोग करून केवळ महाराष्ट्रातील रसिकांपूरतं नव्हे, तर जगभरातील मराठी कुटुंबांपर्यंत ‘खुळखूळा’ पोहचला आणि हसविण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी पार पडला!
  तसा हसविण्याचा धंदा त्यांच्या रक्तात भिनला आहे. त्यांचे वडील ‘नकलाकार पिळणकर’ यांनी एक कालखंड गाजविला होता. त्यावेळी मनोरंजनाची मर्यादित साधनं होती. अशा वेळी नकलांमध्ये रसिकांना दोन अडीच तास गुंतवून त्यांचं मनोरंजन करण्याचा विविधरंगी प्रयत्नही केला. ‘पारशाची नक्कल’ ही त्यातील एक ‘लक्षवेधी प्रमाण’ म्हणून मानली गेली. सिने-नाट्य कलाकार विजय कदम यांनाही त्या नकलेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. नकलाकारांचे महागुरू असलेल्या एका ‘बाप’माणसाचे संस्कार चिरंजीव रत्नाकर यांच्यावर बालपणापासूनच झालेत. याचं प्रत्यंतर ‘खुळखूळा’च्या सादरीकरणात पदोपदी येत राहतं.
  महाराष्ट्रातील नकलाकारांच्या परंपरेत ‘बाजीराव पिळणकर पार्टी’नं मनोरंजनाच्या दुनियेत एक इतिहास घडविला होता. आजोबा, काका, आणि त्यांची मुलं साऱ्यांनीच या अनोख्या ‘पार्टी’तून राज्यभरात त्याकाळी दौरे केले. नकलांना एक रसिकवर्ग त्यातूनच मिळाला. आज काळाच्या ओघात नकलाकारांना पूर्वी इतकं मानाचं स्थान जरी मिळत नसलं तरी कुठेतरी एक इतिहास जागविण्याचा प्रयत्न हा या खुळखूळ्यात करीत आहेत.
  स्वतःची व्यंग दाखवून, प्रसंगी स्वतः कमीपणा घेत आणि विदूषकाच्या भूमिकेत शिरुन कार्यक्रमाची सुरुवात होते आणि त्यात दोनएक तास कसे काय जातात हे रसिकांना कळतही नाही. कारण यात प्रत्येक टप्प्यावर हसवणूक आहे. अंतरीच्या नाना कळा आहेत. ज्या थक्कही करून सोडतात. काहीदा तर मनोरंजनाचा खुळखूळा ‘डोस’ही ठरतो.
  स्वतः रत्नाकर पिळणकर हे जातीवंत नकलाकार आहेतच. शिवाय अनेक मराठी, हिंदी चित्रपटांना संगीत तसेच पटकथा याचाही अनुभव पदरी आहे. अनेक वाद्यांवर त्यांची चांगली हुकमत आहे. सिनेमांना संगीतसृष्टीच्या गोष्टी सांगणारी १६ पुस्तकंही त्यांच्या नावावर जमा आहेत. वास्तुशास्त्राचाही त्यांना चांगला अनुभव आहे. असे बहुरंग असल्यानं ‘खुळखूळा’ हा कार्यक्रम म्हणजे सर्वस्पर्शी बनतो. बाल प्रेक्षकांपासून ते प्रौढ (चावट) प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच हसवून हसवून बेजार करतो. त्यात अनेक चित्रपट ते नाटक आणि संगीत ते ज्योतिष यातले किस्से रंगवून सजवून सांगतात. काहीदा तर ते वेषांतर ही करतात. ‘परकाया प्रवेश’ करुन खुळखूळा बहारदार करतात. आता तर नव्या माध्यमाच्या आधारे ते कोरोनाग्रस्त कुटुंबियांचंही मनोरंजन करून तणाव दूर करतात.
  मराठी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांची ब्रुसली माझा दोस्त व जादूगार गायब ही बालनाट्यं यापूर्वी आली होती. तसंच नवरा हिंदुस्थानी; पैचान कौन?; पहिली पास, दुसरी खास या बड्यांच्या नाटकांचेही लेखन त्यांनी केलंय. या ‘खुळखूळा’तून पडद्यामागे घडलेले धम्माल किस्से ते ज्या प्रकारे पेश करतात तो प्रकार विलक्षणच म्हणावा लागेल. त्यांची हौस, जिद्द व उर्मी यातून एक बहुरुपी दर्शनच रसिकांना होते. अखेर रसिकांशी थेट सवाल – जवाब करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात येते.
  एकपात्री दालनात आज अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. आज हे दालन विस्मृतीत जात आहे. अशावेळी ही पताका निष्ठेने फडकविण्याचा रत्नाकर पिळणकर यांचा प्रयत्न नजरेत भरतो. त्याला असणारी सामाजिक बांधिलकीही लक्षवेधी ठरते. हा ‘वन मॅन शो’ खिळखिळा न होती ‘खुळखूळा’ म्हणून रसिकांना खुळावत राहतो हेच खरे! नव्या पिढीतल्या कलाकारांना प्रेरणादायी धडा म्हणून हा ‘खुळखूळा’ ठरलाय. कुठलीही जाहिरातबाजी, मोठेपण न करता त्यांचे हे काम एकाकी सुरू आहे. कारण हसविण्याचा त्यांचा छंद आहे. वेड आहे. वसा आणि वारसाही आहे !