बॉलिवूडमध्ये मेकअपच्या बहाण्याने ड्रग्ज सप्लाय

दोन मेकअप मेन्सना अटक, ३ लाखांचे ड्र्गज् जप्त
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने ड्रग्ज तस्करांविरोधातली मोहीम तीव्र केली आहे. याबरोबरच मुंबईच्या क्राईम ब्रांचनेही ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. शुक्ररवारी बॉलिवूडमधील नामवंत अभिनेते आणि अभिनेत्रींचा मेक अप करणाऱ्या दोघांना ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून ३ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. बॉलिवूडमधील नामवंतांना हे दोघे ड्रग्ज पुरवित असल्याचा पोलिसांना संशय आहे.
क्राइम ब्रँच यूनिट-१२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना बोरिवलीच्या एसपी टॉवरमध्ये ड्रग्ज तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोन संशयितांना पकडण्यात आले, त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून ३ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हेगार झाले मेकअपमन
हे दोघेही बॉलिवूडच्या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये मेकअप मन म्हणून कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. निकेतन उर्फ निखिल जाधव आणि परवेज उर्फ लड्डू हनीफ अशी यांची नावे आहेत. निखिलवर हत्येचा प्रयत्न, चोरी प्रकरणासह सात गुनह्यांची नोंद असून बोरिवली पोलिसांनी त्याला यापूर्वी तडीपाराही केले आहे.तर परवेजच्या विरोधातही डेन नगर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी जगतातून असिस्टंट मेकअपमनच्या रूपात या दोघांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केला होता. बॉलिवडमध्ये ड्रग्ज खरेदी विक्रीतून चांगले पैसे मिळतात, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर, या दोघांनीही ड्रग्ज तस्करांशी संधान बांधले. आता हे दोघे कोणत्या सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवित होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.