aka lagnachi pudhchi goshta

‘रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून सविनय सादर करत आहोत….’  हे वाक्य पुन्हा कानी पडणार आहे. कोरोना संसर्गमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. ९ महिने हा लॉकडाऊन सुरू होता. या काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. या लॉकडाऊनचा फटका सिनेमागृह आणि नाट्यगृहांनाही बसला. या काळात नाट्यगृहेही बंद होते. मात्र आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व गोष्टी हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे नाट्यगृहेही सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर झी मराठी प्रस्तुत प्रशांत दामले आणि कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ने नाटकांचा श्रीगणेशा सुरू होणार आहे. पुण्यात १२ आणि १३ डिसेंबर रोजी या नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत. या नाटकाच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली आहे.

कोरोना सुरक्षेच्या सर्व नियमांची काळजी घेऊनच नाटकाचे प्रयोग होणार आहेत. नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या नाट्यरसिकांनी मास्क लावूनच नाटक पाहायला येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. तसेच प्रेक्षकांच्या हातावर सॅनिटायझर मारूनच त्यांना आत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक नाट्यरसिकाच्या शरीराचं तापमानही मोजण्यात येणार आहे. शिवाय नाट्यप्रयोगापूर्वी आणि नंतर प्रत्येक नाट्यगृहे सॅनिटाइज करण्यात येणार आहे. आजारी व्यक्तिने नाट्यगृहाकडे न येण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

झी मराठी वाहिनीचे व्यवसाय प्रमुख निलेश मयेकर म्हणाले, एका लग्नाची पुढची गोष्ट ह्या नाटकाने नाट्यश्रुष्टी अनलॉक होतेय ह्याचा खूप आनंद होतोय. यामुळे नाट्यकर्मी आणि एकूणच नाट्य व्यवसायाला एक उभारी मिळेल, झी मराठी ची प्रस्तुती असलेल्या नाटकांची मेजवानी सुद्धा

रसिकांना लवकरच अनुभवता येणार आहे. रसिकप्रेक्षकांनी सुद्धा नाट्यगृहात न घाबरता सुरक्षेची सगळी काळजी घेऊन येणाऱ्या

नाटकांचा आस्वाद घ्यावा.