
सध्या ५० टक्के क्षमतेसह सिनेमागृहं सुरू आहेत. त्यात सिंगल स्क्रीन्स नाहीत. संचारबंदीमुळं लास्ट शो नाही. राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या बातम्या येत असल्यानं रिस्क घ्यायची नाही.
संजय घावरे
मागील वर्षभरापासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी आतूर झालेला ‘इमेल फिमेल’ हा मराठी सिनेमा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेमागृहं बंद करण्यात आल्यानं सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. लॅाकडाऊन संपल्यानंतर ‘इमेल फिमेल’ची टीम पुन्हा नव्या उमेदीनं प्रदर्शनाच्या तयारीला लागली. सिनेमा प्रदर्शित व्हायला चार-पाच दिवस उरले असताना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्यानं पुन्हा लॅाकडाऊनची तलवार लटकू लागली. त्यामुळं दुसऱ्यांदा या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं आहे. या सर्व परिस्थितीत सिनेमाचं आर्थिकदृष्ट्या आणि कलाकारांचं मानसिकदृष्ट्या खूप नुकसान झालं आहे. आज प्रत्येक निर्मात्याची हीच व्यथा आहे. मराठी सिनेसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून ‘इमेल फिमेल’चे दिग्दर्शक योगेश जाधव यांनी ‘नवराष्ट्र’शी खास बातचित करताना सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाबाबत सांगितलं.
‘इमेल फिमेल’ हा सिनेमा मागच्या वर्षी २५ मार्चला प्रदर्शित होणार होता. पत्रकार परिषदेतच सिनेमागृहं बंद होणार असल्याची बातमी आली आणि सारं ठप्प झालं. आता २६ फेब्रुवारी म्हणजेच येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली होती, पण पुन्हा परिस्थिती संवेदनशील झाल्यानं ‘इमेल फिमेल’ला ब्रेक लागला आहे. याबाबत दिग्दर्शक योगेश जाधव म्हणाले की, मागच्या वेळी जे घडलं ते अपघातानं झालं होतं. लॅाकडाऊन लागेल आणि संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. आता तर समोर चित्र दिसत आहे. त्यामुळं आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ५० टक्के क्षमतेसह सिनेमागृहं सुरू आहेत. त्यात सिंगल स्क्रीन्स नाहीत. संचारबंदीमुळं लास्ट शो नाही. राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या बातम्या येत असल्यानं रिस्क घ्यायची नाही.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. यासोबतच मुंबई उपनगरांतही थोडं टेन्शन वाढलं आहे. पुण्यामध्ये बऱ्यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सिनेमा प्रदर्शित करणं उचित नसल्याचं सांगत जाधव म्हणाले की, ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित झाला आणि जर पुन्हा सिनेमागृहं बंद करण्याचे आदेश दिले गेले, तर सिनेमाचं खूप नुकसान होईल. सिनेमा प्रदर्शित करण्याची आमची पूर्ण तयारी झाली होती. दोन्ही वेळेला कलाकारांनीही प्रमोशनसाठी वेळ देत खूप सहकार्य केलं. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत त्यांनी बऱ्याच कार्यक्रमांनाही हजेरी लावली, पण पुन्हा एकदा त्यांची मेहनत वाया गेली. कोणताही सिनेमा प्रदर्शित करताना प्रमोशनसाठी वेगळं बजेट ठेवावं लागतं. या सिनेमाला हे दोनदा करावं लागलं असून, हाती काहीही आलेलं नाही.
लाखोंचा चुराडा!
सिनेमा रसिकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर प्रमोशनवर बरेच पैसे खर्च करावे लागतात. ‘इमेल फिमेल’साठी हा खर्च अटळ होता. याबाबत जाधव म्हणाले की, सिनेमाच्या प्रमोशनसाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. बॅनर, होर्डींग, प्रमोशनल अॅक्टिव्हीटी, कार्यक्रमांना भेटी, मीडिया हाऊस व्हिझीट, माध्यमकर्मींसोबत कलाकारांच्या मुलाखतींची व्यवस्था, वर्तमानपत्र-वाहिन्यांना जाहिरातबाजी, प्रोमोज हे सर्व दोन वेळा करण्यावर आतापर्यंत अंदाजे ५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. दोन्ही वेळा निर्मात्यांनी कुठेही हात आखडता घेतला नाही. आता भविष्यात जेव्हा कधी हा सिनेमा रिलीज होईल, तेव्हा पुन्हा हा खर्च करणं अपरिहार्य आहे. इतकं होऊनही आम्ही उमेद सोडलेली नाही. आमचा सिनेमा चांगला असल्यानं आता पूर्ण क्षमतेसह सिनेमागृहं खुली होतील तेव्हाच रिलीज करू.
पुढल्या वेळी दणक्यात येऊ
‘इमेल फिमेल’ चांगला बिझनेस करेल अशी निर्माते शैलेश कोते आणि मनीष पटेल यांना खात्री आहे. इतर माध्यमांमधूनही आपल्याला इन्कम होण्याची शक्यता असल्यानं निर्माते प्रचंड पॅाझिटीव्ह असल्याचं योगेश यांचं म्हणणं आहे. त्यामुळं पुढल्या वेळीही जेव्हा येऊ तेव्हा दणक्यातच येण्याच निर्मात्यांचा प्रयत्न असेल. जाधव यांनी यापूर्वी आॅस्करसाठी नॅामिनेट झालेल्या ‘कापूस कोंड्याची गोष्ट’चं तंत्रदिग्दर्शन, ‘नटी’चं लेखन-दिग्दर्शन आणि ‘दमलेल्या बाबाची कहाणी’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘इमेल फिमेल’ हा सिनेमा मेसेज देणाराही आहे. काही भुलवणाऱ्या जाहिराती आपल्यापर्यंत येतात, ज्या सभ्य माणसासाठी नसतात. आपण केवळ मोहापायी यात अडकलो आणि त्याचं पर्यवसन एखाद्या दुर्घटनेत झालं, तर काय होऊ शकतं ते यात दाखवण्यात आलं आहे. निखिल रत्नपारखी, कांचन पगारे, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.