सुबोध दादाची कौतुकाची थाप आणि स्वाती कधीही न विसरता येणारी -ऋतुजा बागवे

अनन्या या नाटकातील भूमिकेसाठी ऋतुजाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तिच्या या पुरस्काराची दखल इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसनेही घेतली आहे. ऋतुजाच्या या प्रवासाबद्दल तीने नवराष्ट्रशी केलेली ही खास बातचीत.

  नुकताच ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली. पण त्यातही भाव खाऊन गेली ती स्वाती म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा बागवे. या आधी ऋतुजा ‘तू माझा सांगाती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतही दिसली होती. पण ऋतुजाने साकारलेल्या स्वातीचं कौतुक हे अधिक झालं. त्याचबरोबर प्रताप फड लिखित-दिग्दर्शित अनन्या नाटक गेले दीड वर्ष मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वताचं आयुष्य बदलणाऱ्या अनन्याचं काम अभिनेत्री ऋतुजा बागवे तितक्याच तन्मयतेने करते. 

  ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेने मला बरच काही दिलय. या मालिकेच्या निमित्ताने मला उत्तमोत्तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांच्याबरोबर तू माझा सांगाती या मालिकेत काम केलं होतं. पण या नंतर इतक्या वर्षांनी पुन्हा या दोघांबरोबर काम करता आलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुबोध भावे सारख्या कलाकाराबरोबर काम करता आलं. त्यामुळे संपूर्ण प्रवासात खूप शिकता आलं. एक अभिनेत्री म्हणून मी खूप काही सहकलाकारांकडून शिकले. एकूणच स्वाती साकारताना खूप मज्जा आली. मालिकेतील सगळ्याच कलाकारांची खूप आठवण येणार आहे. कारण आम्ही सगळेच खूप धम्माल करायचो.

  दोन भिन्न भूमिका

  अनन्यानंतर मला मी अशाच भूमिकेच्या शोधात होते जे अनन्या पेक्षा खूप वेगळं आहे. त्याचप्रमाणे स्वातीची भूमिका आहे. दोघी अतिशय भिन्न आहेत. कारण स्वाती ही अनन्या इतकी खंबीर नाहीये. मालिकेत एका वळणावर स्वाती आत्महत्येचाही प्रयत्न करते. पण अनन्या ही अतिशय खंबीर आहे. त्यामुळे या दोन्ही भिन्न भूमिका करताना आपल्यावर जबाबदारी तितकीच असते. या भूमिका फेक न वाटता तितक्याच त्या खऱ्या वाटाव्यात अशा पध्दतीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवणं ही कलाकारावर मोठी जबाबदारी असते.

  सुबोधची कौतुकाची थाप

  मालिकेत स्वातीला जेव्हा आपण फसवले गेलो आहोत हे समजतं तो भाग प्रसारीत झाल्यानंतर मला पहिला फोन हा सुबोध भावेचा आला होता, आजचा एपिसोड खूप चांगला झाला. तुझी अमूक एक रिअक्शन खूप सुंदर होती. त्याचा फोन आल्यानंतर मला खूप आनंद झाला की इतक्या मोठ्या कलाकाराकडून आपल्या कामाचं कौतुक झालं. त्याचप्रमाणे सुबोध दादाने सोशल मीडियावर जाहीररित्या माझ्या कामाचं खूप कौतुक केलं. त्यानंतर मला आणखी चांगली काम करण्याची ऊर्जा मिळाली आणि जबाबदारीही वाढली.

  अनन्याने मला घडवलं

  तब्बल एक वर्षांनंतर अनन्या हे नाटक रंगभूमिवर आलं. एक प्रयोग झाला आणि पुन्हा लॉकडाऊन लागला. पाच ते सहा दिवस नाटकाची तालीम केली आणि प्रयोग केला. नाटकाच्या त्या एका प्रयोगानेही मला प्रचंड समाधान दिलं.

  अनन्याने खूप पुरस्कार मला मिळालेच पण हे केवळ पुरस्कारांपुरत मर्यादीत नाहीये. तर अनन्यामुळे मला प्रेक्षकांच प्रचंड प्रेम मिळालं. प्रेक्षकांचा माझ्याकडे अभिनेत्री म्हणून बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे हे मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. अनन्याने मला खूप काही दिलय. अनन्या ही माझ्या सगळ्यात जवळची आहे. माणूस म्हणून माझ्यात अनेक बदल हे अनन्यामुळे घडले आहेत. मी स्ट्रॉन्ग होतेच पण मी खूप रागीट होते. पण अनन्यामुळे मी आता खूप शांत झालेय. अनन्या नाटकाच्या प्रयोगानंतर भारतीताई मंगेशकरांनी मला गळ्यातली सोन्याची चेन काढून दिलेली ती माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यावेळी खूप रडायला येत होत मला. पण त्यावेळी आपल्याला आता कायमच चांगल काम करत रहावं लागणार आहे याची जाणीवही झाली होती.

  ती अनन्या माझीच

  अनन्यावर चित्रपट येतोय आणि त्यात अनन्या म्हणून मी नसणार आहे. खूप वाईट वाटलं. मी खूप रडलेही होते. पण माझ्यातल्या अनन्यानेच मला यातून बाहेर काढलं. मोठ्या मनानं सगळ्या गोष्टींचा स्वीकार कर, कलाकारानं समाधानी असावं संतुष्ट नाही. पुढे जा, नवी भूमिका स्वीकार, अनन्यात अडकू नको आणि मी ही तेच केलं. शेवटी नाटकातली अनन्या ही कायम माझीच राहणार आहे.

  ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते

  ट्रोलर्सला उत्तर देऊन त्यांच महत्त्व वाढवयला नकोच. पण काहीवेळा उत्तर देणं भाग पडतं. अशावेळी सन्मानपूर्वक उत्तर द्यायला हवं. कारण आपण जर त्यांना सन्मान दिला नाही तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक रहात नाही. त्यापेक्षा त्यांना दुर्लक्ष करणे हे सगळ्यात उत्तम आहे. कधी कधी खूप राग येतो की का हे असे वागतात पण मला असं वाटतं ते मानसिकदृष्ट्या स्थिर नसतील म्हणून ते कदाचीत असं वागत असतील. त्यांना एक माध्यम मिळालय आणि त्याचा जमेल तसा चुकीचा वापर ते करत असतात.