जहांगीरमध्ये ‘ट्रंक्स अँड ट्रँक्विलिटी’ भाविका मंगनानी यांच्या चित्रकलाकृतींचे २३ फेब्रुवारीपासून प्रदर्शन

कोणतीही कला ही पाहणाऱ्याच्या मनावर सकारात्मक परिणाम करते आणि याचा प्रभाव कायमस्वरूपी असल्याने यात समाज बदलण्याची ताकद असते. कला हे कलाकार आणि रसिकांना जोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे भाविका सांगतात.

    मुंबई : ”मला माझ्या चित्रांमधून प्रेम आणि आनंद पसरवायला आवडतो,” असं सांगणाऱ्या भाविका मंगनानी यांच्या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन ‘ट्रंक्स अँड ट्रँक्विलिटी’ या शीर्षकांतर्गत २३ फेब्रुवारीपासून जहांगीर कला दालनात सुरू होत आहे. १ मार्चपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन रसिकांना नि:शुल्क बघता येईल.

    कोणतीही कला ही पाहणाऱ्याच्या मनावर सकारात्मक परिणाम करते आणि याचा प्रभाव कायमस्वरूपी असल्याने यात समाज बदलण्याची ताकद असते. कला हे कलाकार आणि रसिकांना जोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे भाविका सांगतात.

    भाविका यांना कल्पना शेअर करायला आवडते. त्या सांगतात कि, ‘मी खूप वेगळ्या प्रकारच्या आयुष्याचा अनुभव घेते. खरंतर प्रत्येक कलाकार त्याच्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पहात असतो. आमच्यासाठी पाऊस हा केवळ पाऊस नसतो तर आमचे संदेशवाहक असतात. माणसं आमच्यासाठी माणसं नाही तर एक कॅरेक्टर असतात, आणि नद्या आमच्या बेस्ट फ्रेंड असतात. आम्हाला जे जे भावतं, ते आम्ही आमच्या कलेच्या साहाय्याने कॅनव्हासवर उतरवतो. लहानपणी ऐकलेली आणि आपल्या मनाला भावलेली गोष्ट आयुष्यभर आपल्या लक्षात असते. त्याचा परिणाम आपल्या मनावर झालेला असतो.

     

     

    नेमका हाच परिणाम साधण्याचा आमचा प्रयत्न असतो. कारण लहानपणी ऐकलेल्या या गोष्टींमध्ये जसं तुमचं मन रमवायची कला असते, तशीच तुम्हाला प्रेरणा देण्याची, धीर देण्याची आणि शिकवण्याची पण असते.’ सगळीकडे प्रेम पसरवायची आवड असणाऱ्या भाविका म्हणतात, जरी तुम्ही विस्मृतीत गेलात तरी तुम्ही लोकांसाठी जे काही केलं आहे, ते त्यांच्या कायम लक्षात राहतं. सध्याच्या जगात माणूस त्याच्या स्वभावापेक्षा त्याच्या पदाने ओळखला जातो. पण मला हे मान्य नाही. त्यापेक्षा सगळ्यांनी आपापसात प्रेमाने राहावं असं मला वाटतं.” अशी भूमिका मांडणाऱ्या भाविका यांना त्यांची हीच भूमिका प्रत्यक्षात आणण्यासाठी कला हाच एक मार्ग असल्याचे वाटते. आणि चित्रांमधून त्या हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.

    प्राणी तसेच निसर्गाकडून आपण अनेक गोष्टी कशा शिकून घ्याव्यात हे देखील मी चित्रांमधून सांगत असते. एकेमकांवर आपण कसं निरपेक्षपणे प्रेम करू शकतो, हे देखील माझ्या चित्रांमधून कळतं. माझ्या ‘aesthetics’ या चित्रामध्ये निसर्गाचे सौंदर्य दाखवले आहे. निसर्ग कसा आतूनच उमलत जातो, हे आपण यात अनुभवू शकतो. त्याचप्रमाणे आपणही आंतर्बाह्य सुंदर होऊ शकतो. यासाठी गरज आहे ती फक्त प्रेम, आनंद पसरवण्याची. यासाठी पहिली गरज आहे ती स्वतःला ओळखण्याची. स्वतःवर प्रेम करण्याची. स्वतःला आदर देण्याची. एकदा आपण स्वतःवर प्रेम करू लागलो, स्वतःचा आदर करायला लागलो, की इतरांना प्रेम, आदर देणं आपल्याला आपोआप जमत. आणि मग समाजाकडूनही आपल्याला तेच परत मिळतं. एक कलाकार म्हणून मी नेहमी याचाच विचार करत असते. आणि माझ्या ‘गुड व्हाईब्ज’ या चित्रामधूनही मी हेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

    • चित्रकार : भाविका मंगनानी
    • प्रदर्शनाचे शिर्षक : ‘ट्रंक्स अँड ट्रँक्विलिटी’
    • कालावधी: २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१
    • स्थळ: जहांगीर कलादालन, काळा घोडा, मुंबई
    • वेळ: सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत