‘द फॅमिली मॅन ३’ ची तयारी सुरू, श्रीकांत तिवारी करणार चीनी शत्रुशी दोन हात!

या सीझनची कथा ही देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित आहे. या सीझनमध्येही मनोज बाजपेयीसोबत शारिब हाश्मी आणि प्रियमणी मुख्य भूमिकांमध्ये असणार आहे.

    अभिनेता मनोज वाजपेयीची सुपहिट वेबसिरीज द फॅमिली मॅन चा दुसरा सीझन ४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला. सस्पेन्स आणि अॅक्शननी भरलेल्या या थ्रीलर वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दोन सीझनच्या यशानंतर आता निर्मात्यांनी या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची तयारीही सुरू केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी श्रीकांत आणि त्याची टीम आता चीनी शत्रुशी दोन हात करणार आहेत.

    ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा सीझन हा करोना व्हायरसच्या काळातीलच असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सीझनची कथा ही देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित आहे. या सीझनमध्येही मनोज बाजपेयीसोबत शारिब हाश्मी आणि प्रियमणी मुख्य भूमिकांमध्ये असणार आहे.

    तिसऱ्या सीझनमध्ये भारताच्या विरोधात चीननं एक मिशन आखल्याचं दाखवण्यात येणार आहे. ज्याचं नाव ‘गुआन यू’ असं असेल. हे चीनच्या हान राजवंशातील एका मिलिटरी अधिकाऱ्याचं नाव होतं. ज्याला चीनमध्ये खूप महान मानलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आणि श्रीलंकानंतर आता श्रीकांत तिवारी आपल्या टीमसोबत चीनमध्ये गुप्त मिशन चालवणार आहे.