ढाक्कुमाकूम ढाक्कुमाकूम… गोविंदा रे गोपाळा…या बॉलिवूडच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं राज्य!

काही अजरामर दहीहंडी गीतांची निर्मिती झाली आहे. काही नॅान फिल्मी गीतांनीही गोपाळकाल्याच्या या सणाचा आनंद करत रसिकांवर मोहिनी घातली आहे.

    रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म झाला की, लगेचच थरावर थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज होतात. श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि गोविंदांचे थर लागले नाहीत असं आजवर कधी झालं नव्हतं, पण मागच्या वर्षापासून गोपाळकाला या गोविंदांच्या लाडक्या सणालाही ग्रहण निर्बंधांचं लागलं आहे. कोरोना महामारीमुळं इतर सणांप्रमाणे गोपाळकाला सणावरही संक्रांत आली आहे. सरकारनं दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीला ३१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यानं मागच्या वर्षाप्रमाणं यंदाही ‘ढाक्कुमाकूम ढाक्कुमाकूम…’चा स्वर गल्लोगल्ली घुमणार नसल्याचं चित्र दिसत आहे. यंदाही गोविंदांचा सण सुकाच जाणार आहे. असं असलं तरी दरवर्षीप्रमाणं यंदाही गोपाळकाल्यावर आधारीत असलेली गाणी गोविंदांच्या सोबतीला असतील यात शंका नाही. गोपाळकाल्याच्या उत्सवानं मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांच्या दिग्दर्शकांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. यातूनच काही अजरामर दहीहंडी गीतांची निर्मिती झाली आहे. काही नॅान फिल्मी गीतांनीही गोपाळकाल्याच्या या सणाचा आनंद करत रसिकांवर मोहिनी घातली आहे. दहीहंडीचा आनंद द्विगुणीत करण्यात ‘जितेगा वही जिसमें है दम…’, ‘आला गोविंदा आला…’, ‘चला रे गोविंदा खेळू चला…’, ‘गोविंदा गोविंदा…’, ‘या वर्षाची दहिहंडी…’, ‘गोविंदा तेरा कृष्ण कन्हैया…’, ‘गोविंदा आलाय बघा रे…’, ‘दहिहंडी फोडूया चला…’ या गाण्यांचाही मोलाचा वाटा आहे. यंदाची दहीहंडी गोविंदांना या गीतांच्या साथीनंच साजरी करावी लागणार आहे.

    गोविंदा आला रे आला…
    १९६३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लफमास्टर’ या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील ‘गोविंदा आला रे आला…’ हे शम्मी कपूरवर चित्रीत झालेलं गाणं आजही दहिहंडी फोडण्यासाठी थर रचताना गोविंदांचा उत्साह वाढवण्याचं काम करतं. मनमोहन देसाईंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात सायरा बानो, प्राण, ललिता पवार, मोहन चोटी या कलाकारांच्या भूमिका आहेत. संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी हे गाणं मोहम्मद रफींच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. आजही हे गाणं गोपाळकाला उत्सवात प्रामुख्यानं वाजवलं जातं.

    शोर मच गया शोर…
    ‘शोर मच गया शोर…’ हे ‘बदला’ या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजातील गाणं जेव्हा दहिहंडीच्या सणाला वाजतं, तेव्हा अबालवृद्धांचे पाय आपोआप थिरकू लागतात. विजय यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा, मौसमी चॅटर्जी, अजित, जॅान वॅाकर, मेहमूद, पद्मा खन्ना, इफ्तेखर, सुजित कुमार, निरुपा रॅाय, जयश्री टी आदींच्या भूमिका आहेत. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील शत्रुघ्न सिन्हा आणि भगवानदादा यांच्यावर शूट झालेाल्या या गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं आहे.

    तीन बत्ती वाला गोविंदा आला…
    शत्रुघ्न सिन्हा आणि सुनील दत्त यांचा तीन बत्ती आणि लाल बत्तीवाला गोविंदा कोणीही विसरू शकणारा नाही. १९७९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘मुकाबला’ या चित्रपटातील ‘तीन बत्ती वाला गोविंदा आला…’ हे गोविंदा गीत आणि त्यातील शत्रु आणि सुनील यांची जुगलबंदी सर्वांनीच पाहिलेली आहे. मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीबद्ध केलं आहे. रीना रॅाय, बिंदीया गोस्वामी, राजेश खन्ना, रेखा, प्रेमनाथ, मदन पुरी, रणजीत यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार कोहलींनी केलं आहे.

    मच गया शोर सारी नगरी रे…
    दहिहंडीच्या सणाला अमिताभ बच्चन यांच्या ‘खुद-दार’ चित्रपटातील ‘मच गया शोर सारी नगरी रे…’ हे गाणं वाजलं नाही असं आजवर कधी झालेलं नाही. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार, विनोद मेहरा, परवीन बाबी, तनुजा, बिंदीया गोस्वामी, प्रेम चोप्रा, मेहमूद, रमेश देव, ए. के. हंगल, मधु मालिनी, मुक्री, गजानन जहांगीरदार अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली. रवी टंडन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं लेखन कादर खान यांनी केलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्याला राजेश रोशन यांनी स्वरसाज चढवला आहे. मजरूह सुल्तानपुरी यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं आहे.

    आला रे आला गोविंदा आला…
    ‘आला रे आला गोविंदा आला… ओ चलो मिलके चलो रे सब ग्वाले…’ हे ‘काला बाजार’ चित्रपटातील गाणं अनिल कपूर आणि जॅकी श्रॅाफ यांच्यावर शूट करण्यात आलं आहे. अनुराधा पौडवाल, अमित कुमार, शब्बीर कुमार यांनी गायलेलं हे गाणं इंदीवर यांनी लिहीलं आहे. राजेश रोशन यांनी संगीत दिेलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केलं आहे. १९८९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटात फरहा, किमी काटकर, कादर ख़ान, रज़ा मुराद, किरण कुमार, शफ़ी ईनामदार, जॉनी लीवर, डॅा. श्रीराम लागू, अंजना मुमताज़, सुधीर जोशी, अपराजिता, चंद्रशेखर, सुजीत कुमार, सुधीर पांडे आदी कलाकारांनी काम केलं आहे.

    हर तरफ है ये शोर…
    १९९९मध्ये महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘वास्तव – द रिअॅलिटी’ या संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातील ‘हर तरफ है ये शोर…’ हे गाणंही गोविंदाचा उत्साह वाढवण्याचं काम करत आलं आहे. गुन्हेगारी जगतावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटात संजयसोबत नम्रता शिरोडकर, दीपक तिजोरी, संजय नार्वेकर, मोहनीश बहल, एकता सोहिनी, शिवाजी साटम, रीमा लागू, उषा नाडकर्णी, परेश रावल, मोहन जोशी, आशिष विद्यार्थी, गणेश यादव, किशोर नांदलस्कर, भरत जाधव, अच्युत पोतदार, मकरंद अनासपुरे, सतिश राजवाडे, अतुल काळे, निलेश दिवेकर अशी मराठी कलाकारांची मोठी फळी आहे. ‘हर तरफ है ये शोर…’ हे गाणं विनोद राठोड आणि अतुल काळे यांनी गायलं असून, समीर यांनी लिहीलं आहे. जतिन-ललित यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

    ढाक्कुमाकूम ढाक्कुमाकूम…
    विनय मांडके, प्रज्ञा खांडेकर, किरण शेंबेकर यांच्या आवाजातील ‘हमाल दे धमाल’ चित्रपटातील ‘ढाक्कुमाकूम ढाक्कुमाकूम…’ हे गाणं खरोखर धमाल आहे. पुरुषोत्तम बेर्डेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, रमेश भाटकर, सुधीर जोशी, निळू फुले, सोनाली अधिकारी, आदेश बांदेकर, रविंद्र बेर्डे, अशोक शिंदे, चेतन दळवी, विजय पाटकर, दीपक शिर्के आदी मराठीतील आघाडीच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटात हमाल बनलेल्या धमाल लक्ष्याची कहाणी पहायला मिळाते. ढाक्कुमाकूम ढाक्कुमाकूम… असं म्हणणाऱ्या लक्ष्यावर चित्रीत झालेलं ‘खिडकीतल्या ताई जरा वाकू नका…’ हे गाणं आजही खूप पॅाप्युलर आहे.

    गो गो गो गोविंदा…
    अक्षय कुमार आणि अश्विनी भावे यांची भूमिका असलेल्या ‘कायदा कानून’ या चित्रपटातील ‘गोविंदा आया धूम मचाने…’ हे गीत उदित नारायण यांनी गायलं आहे. प्रदीप मानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला आनंद-मिलिंद यांनी संगीत दिलं आहे. ‘चांदी की डाल पर सोने का मोर…’ हे गाणं आहे १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॅलो ब्रदर’ या सलमान खान आणि राणी मुखर्जी यांच्या चित्रपटातील. सलमान खान आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गाण्याला हिमेश रेशमियानं संगीत दिलं आहे. सोहेल खाननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘ओ माय गॅाड’ या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि प्रभू देवा यांचं ‘गो गो गो गोविंदा…’ हे गाणंही काहीसं हटके आहे. श्रेया घोषाल आणि मिका सिंग यांनी हे गाणं आजच्या स्टाईलमध्ये गायलं असून, या गाण्यानं कोरिओग्राफीसाठी पुरस्कारही पटकावला आहे.