‘नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला…’, मराठीत चित्रपटात कृष्णावर आधारीत गाजलेली काही गाणी!

यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधत मराठी सिनेमांमधील कृष्णावर आधारलेल्या अजरामर गीतांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप..

  श्रावण महिना चराचरामध्ये नवचैतन्य घेऊन येतो. सणांचा महिना म्हणूनही आपली ओळख जपणाऱ्या श्रावणातील शेवटचा सण म्हणजे गोकुळाष्टमी… ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।’ या श्लोकानुसार भगवान श्रीविष्णूंनी कंसानं बंदिखान्यात डांबलेल्या देवकी-वसुदेवाच्या पोटी श्रीबाळकृष्णाच्या रूपात अवतार धारण केला. कारागृहाच्या कोठडीतील श्रीकृष्ण जन्माचं वर्णन बऱ्याच संतांनी आपापल्या शैलीत केलं आहे. अनेक गीतकारांनीही श्रीकृष्ण जन्मावर कवनं रचत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. त्याला सुरेल संगीताची किनार जोडत संगीतकारांनी संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केलं आहे. लेखक-दिग्दर्शकांनी त्या गीतांचा समावेश आपल्या चित्रपटांमध्ये करत मराठी सिनेसृष्टीची शोभा वाढवली आहे. यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधत मराठी सिनेमांमधील कृष्णावर आधारलेल्या अजरामर गीतांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
  मराठी चित्रपटांना फार मोठी परंपरा आहे. आशयघन कथानकाच्या जोडीला सुमधूर संगीतरचनांची किनार जोडत कृष्णधवल चित्रपटांच्या युगापासून आजवर अनेक गायक-संगीतकारांनी श्रीकृष्णाचे गोडवे गायले आहेत. कृष्णधवल युगातील गाण्यांचा बाज काही वेगळाच होता. त्या काळातील संगीताची लय आणि धुनही नंतरच्या काळातील संगीतापेक्षा अतिशय भिन्न होती. ‘अमर भूपाळी’ या १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलेल्या ‘सांगा मुकूंद कुणी हा पाहिला…’ हे गीत आजही मनाला तितकाच आनंद देणारं ठरत आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि पंडीतराव नगरकर यांनी गायलेलं हे गीत वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं आहे. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात पंडीतरावांनी शाहीर होनाजी बाळांची व्यक्तिरेखा साकारली आहे, तर संध्या यांनी गुणवंती बनून त्यांना साथ दिली आहे.

  घननीळा, लडीवाळा…
  दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उमज पडेल तर’ या सामाजिक चित्रपटातील ‘घननीळा, लडीवाळा झुलवू नको हिंदोळा…’ हे ग. दि. माडगूळकर लिखीत आणि सुधीर फडके म्हणजेच सर्वांचे लाडके बाबूजी यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं पहाडी रागातील गीत एका वेगळ्याच विश्वात नेणारं आहे. बाबूजी यांनी माणिक वर्मांसोबत हे गीत गायलंही आहे. चित्रा, रमेश देव, दादा साळवी, शांता जोग, जीवनकला केळकर, आत्माराम भेंडे, शरद तळवलकर, दत्तोपंत आंग्रे, शोभा खोटे आदी कलाकारांच्या अभिनयानं सजलेला हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता.

  कशी गवळण राधा बावरली…
  ‘कशी गवळण राधा बावरली…’ हे १९६८ मध्ये मराठी रसिकांच्या भेटीला आलेल्या ‘एक गाव बारा भानगडी’ या गाजलेल्या तमाशापटातील राधा-कृष्णावर आधारित गीतानं सर्वांनाच मोहिनी घातली. जयश्री गडकर, अरुण सरनाईक आणि गणपत पाटील यांच्यावर चित्रीत झालेलं हे गीत कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलं आहे. राम कदम यांनी भैरवी रागात याची चाल बांधली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या सुमधूर आवाजानं हे गीत अधिक श्रवणीय बनवलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत त्या काळी सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत माने यांनी केलं आहे.

  किती सांगू मी सांगू कुणाला…
  १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘सतीचं वाण’ या चित्रपटात प्रेक्षकांना वास्तववादी कथानक पहायला मिळालं. या चित्रपटातील ‘किती सांगू की सांगू कुणाला…’ हे गाणं आजही ताल धरायला लावतं. या चित्रपटातील कृष्णजन्माष्टमीचं हे गीत जगदीश खेबूडकरांनी लिहिलं असून, प्रभाकर जोग यांनी आशा भोसलेंच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. गोकुळाष्टमीचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या या गीतात अभिनेते धुमाळ कृष्णाच्या रूपात दिसतात. यात त्यांच्या जोडीला आशा काळे, कृष्णकांत दळवी, गजगेश्वर, तारा किणीकर, पुष्पा जोशी, बी. माजनाळकर, मधू आपटे, लता कर्नाटकी, ललिता पवार, वसंत शिंदे, शांता तांबे आदी कलाकार आहेत.

   

  आज गोकुळात रंग खेळतो हरी…
  ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी…’ हे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं दर्शन घडवणारं आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सुरेश भटांच्या लेखणीतून अवतरलेलं आहे. त्या काळातील गाजलेलं हे गीत आजही वाजू लागलं की रसिक तल्लीन होतात. सुरेश भटांच्या अर्थपूर्ण शब्दांना लतादीदींच्या आवाजाची मोहिनी लाभली आणि हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सर्वांच्याच हृदयावर कोरलं गेलं. आजही लतादीदी जेव्हा या गाण्याविषयीची आठवण सांगतात, तेव्हा मराठी सिनेमांच्या त्या सुवर्णयुगाची आठवण नक्कीच होते.

  अरे मनमोहना रे…
  कमलाकर तोरणे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या १९७७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटानं महाराष्ट्रातील अबालवृद्धांना अक्षरश: वेड लावलं होतं. या चित्रपटात आशा काळे यांच्यावर चित्रीत झालेलं ‘अरे मनमोहना कळली नाही तुला राधिका…’ हे सदाबहार गाणं आजही खूप लोकप्रिय आहे. विक्रम गोखले, पु. ल. देशपांडे, मधुकर तोरडमल यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली आहेत, पण एन. दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत गोकुळाष्टमी विशेष आहे. हे गाणंसुद्धा जगदीश खेबूडकरांनीच लिहिलं आहे.

  झुलतो बाई रास झुला…
  ‘जानकी’ हा चित्रपट १९७९ मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात रसिकांना पुन्हा लतादीदींच्याच आवाजाची जादू अनुभवायला मिळाली. यातील ‘झुलतो बाई रास झुला…’ हे गीत अजरामर झालं आहे. गीतकार श्रीधर मोघे यांनी लिहिलेलं हे गीतसुद्धा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनीच संगीतबद्ध केलं आहे. डॅा. श्रीराम लागू, सीमा देव, अशोक सराफ, उषा नाईक, राज गोस्वामी, धुमाळ आदी त्या काळातील दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. मराठी चित्रपटातील हा गरबा प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.

  अगं नाच नाच नाच राधे…
  १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोधळात गोंधळ’ या दिग्दर्शक व्ही. के. नाईक यांच्या चित्रपटातील ‘अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग…’ या गाण्यात त्या काळातील अशोक सराफ आणि रंजना या सुपरहिट जोडीची केमिस्ट्री अनुभवायला मिळते. या गाण्यात त्यांचा एक वेगळाच अंदाज दिसतो. या गाण्यात अशोक सराफ कृष्णाच्या, तर रंजना राधेच्या रूपात आहे. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजानं सजलेलं हे गीत कानी पडताच याच्या तालावर नृत्य करणारी अशोक-रंजना ही जोडी अनाहुतपणं डोळ्यांसमोर उभी रहाते. जगदीश खेबूडकर यांनी लिहीलेलं हे गीत संगीतकार विश्वानाथ मोरे यांनी शंकरा या रागात बांधलं आहे.

  सांज ये गोकुळी…
  ‘वजीर’ या संजय रावल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या चित्रपटातील ‘सांज ये गोकुळी…’ हे आशा भोसले यांच्या आवाजातील गाणंही खूप गाजलं आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गीतांना सुधीर फडके यांनी स्वरसाज चढवला आहे. अशोक सराफ, विक्रम गोखले, अश्विनी भावे, उज्वल ठेंगडी, इला भाटे, आशुतोष गोवरीकर, कुलदीप पवार, चंद्रकांत गोखले, कुसुम देशपांडे, फैयाज, प्रतिभा अमृते, सयाजी शिंदे, सुधीर जोशी, प्रदीप वेलणकर, सुनिल शेंडे, अर्जुन ठेंगडी, इर्शाद हाश्मी, वरदा बाळ, ऐश्वर्या सबनीस, आदित्य राव अशी मराठीतील भलीमोठी आघाडीची स्टारकास्ट या चित्रपटात होती. मराठी चित्रपटांमधील कृष्णावर आधारलेली ही गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत असून, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपोआप ओठांवर येतात.