ठरलं….या दिवशी प्रदर्शित होणार फरहान अख्तरचा तुफान!

'भाग मिल्खा भाग' या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान आणि मेहरा ही दमदार जोडी 'तूफान'मधून पुन्हा एकदा रसिकांसमोर एक दमदार पंच घेऊन आली आहे.

    फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेल्या ‘तूफान’ या बहुचर्चित, प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाच्या प्रीमिअरची तारीख अमेझॉन प्राइम व्हिडीओनं जाहीर केली आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि राकेश ओमप्रकाश मेहरांच्या आरओएमपी पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘तूफान’ या वर्षातील भव्य स्पोर्ट्स ड्रामा आहे. ‘तूफान’मध्ये फरहानसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असून, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

    ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान आणि मेहरा ही दमदार जोडी ‘तूफान’मधून पुन्हा एकदा रसिकांसमोर एक दमदार पंच घेऊन आली आहे. मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू नावाच्या अनाथ मुलाची ही प्रेरणादायी कथा आहे. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.

    ‘तूफान’मध्ये बॉक्सिंगसोबतच आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य तरुणाचा जीवनप्रवासही रेखाटला आहे. जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.