सलमान-फरहान-झोयाचा ‘अँग्री यंग मॅन’,वाचा काय आहे हे नेमकं!

मागील काही दिवसांपासून झोया यावर काम करत असल्याचं समजतं. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या डॅाक्युमेंट्रीला 'अँग्री यंग मॅन' असं शीर्षक देण्यात आलं आहे.

    एकेकाळी सुपरहिट सिनेमांची जणू मालिकाच देणाऱ्या सलीम-जावेद म्हणजेच सलीम खान आणि जावेद अख्तर या सुपरस्टार लेखक जोडीवर आधारीत डॅाक्युमेंट्रीचं दिग्दर्शन नेमकं कोण करणार याबाबत मध्यंतरी जोरदार चर्चा सुरू होती. फरहान अख्तर आणि झोया अख्तर हे दोन तगडे दिग्दर्शक घरी असताना या डॅाक्युमेंट्रीच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दोघांपैकी कोणीतरी एक जण स्वीकारेल असं बोललं जात होतं, पण अद्याप हे चित्र स्पष्ट झालेलं नाही.

    मागील काही दिवसांपासून झोया यावर काम करत असल्याचं समजतं. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या डॅाक्युमेंट्रीला ‘अँग्री यंग मॅन’ असं शीर्षक देण्यात आलं आहे. खरं तर मागील बऱ्याच काळापासून अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन म्हणून संबोधलं जातं. ‘जंजीर’मध्ये साकारलेल्या पोलीसी व्यक्तिरेखेनं अमिताभना अँग्री यंग मॅन बनवलं. सलीम-जावेद यांनी या सिनेमाचं लेखन केलं होतं. याच कारणामुळं या डॅाक्युमेंट्रीला ‘अँग्री यंग मॅन’ हे टायटल देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

    सलमान खानच्या साथीनं सलमान खान फिल्म्स, एक्केसल एन्टरटेन्मेंट आणि टायगर बेबी या बॅनरखाली फरहान आणि झोया या डॅाक्युमेंट्रीची निर्मिती करणार आहे. सलीम-जावेद यांच्या करियरवर आधारीत असलेला ‘अँग्री यंग मॅन’ हा माहितीपट सिनेप्रेमींसाठी जणू एक पर्वणी ठरणार असून, जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे.