रशियामध्ये टायगर-ताराची ‘हिरोपंती’, मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये अ‍ॅक्शन सीन चित्रित होणार!

चित्रपटातील लार्जर दॅन लाइफ अॅक्शन दृश्यं चित्रीत करण्यासाठी काही तज्ज्ञ स्टंट डिजाइनर्ससोबत बोलणंही सुरु आहे. ज्यामध्ये मार्टिन इवानो यांचंही नाव आहे.

    अहमद खानद्वारे दिग्दर्शित साजीद नाडियाडवाला यांच्या आगामी ‘हिरोपंती २’ने मार्च महिन्यात मुंबईमध्ये एक छोटे शूटींग शेड्यूल पूर्ण केलं होतं. आता या टीमनं आपला मोर्चा रशियाच्या दिशेनं वळवला आहे. चित्रपटाचं दुसरे शूटींग शेड्यूल रशियात पार पडणार आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या कलाकारांसह तंत्रज्ञांची टीम पुढच्या महिन्यात मॉस्कोमध्ये आणि त्यानंतर रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीकरण करणार आहे.

    ‘हिरोपंती २’शी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हिरोपंती २’च्या टीमनं मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील प्रमुख अॅक्शन दृश्यांसोबतच एका गाण्याचं चित्रीकरण करण्याची योजना आखली असून, तिथल्या स्थानिक टीमसोबत मिळून परफेक्ट लोकेशनचा शोध घेतला जात आहे. शिवाय चित्रपटातील लार्जर दॅन लाइफ अॅक्शन दृश्यं चित्रीत करण्यासाठी काही तज्ज्ञ स्टंट डिजाइनर्ससोबत बोलणंही सुरु आहे. ज्यामध्ये मार्टिन इवानो यांचंही नाव आहे.

     मार्टीन यांनी ‘स्कायफॉल’, ‘द बॉर्न अल्टीमेटम’ आणि ‘द बॉर्न सुप्रमसी’ या चित्रपटांचं अॅक्शन दिग्दर्शन केलं आहे. ‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा नाडियाडवाला यांनी टायगरला धडाकेबाज अॅक्शनसोबत रुपेरी पडद्यावर लाँच केलं होतं. ‘हिरोपंती २’मध्ये देखील चमकदार आणि स्टाइलिश अॅक्शनचा जलवा पहायला मिळणार आहे.