…आणि अखेर कंगनाची मुंबईत ‘एन्ट्री’; तीन दिवस राहणार होम क्वारंटाइन

चंदिगढहून विमानाने आलेली कंगना रणौत बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुंबई विमानतळावरून बाहेर पडली.

मुंबई : कंगना रणौत (kangana ranaut) बुधवारी दुपारी मुंबई विमानतळावरून (mumbai airport) बाहेर पडली. चोख सुरक्षाव्यवस्थेत तिला तिच्या वांद्रे (Bandra) येथील घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे. चंदिगढहून (Chandigarh) विमानाने आलेली कंगना रणौत बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुंबई विमानतळावरून बाहेर पडली. तिच्या कारला प्रसारमाध्यमांच्या गाड्यांनी किंवा अन्य विरोधकांनी फॉलो करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून तिला पूर्ण सुरक्षेत पश्चिम द्रुतगती महामार्गावरून (western express highway) नेण्यात आले.

यादरम्यान विमानतळाला जोडलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मुख्य म्हणजे तिच्या घराच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद असल्याने काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.

अखेर कंगना तिच्या खारमधील बंगल्यावर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत पोहोचली. प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींसह तिच्या समर्थकांनी तसेच विरोधकांनी गाडीच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला; मात्र खार पोलिसांनी तसेच तिच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी कोणालाच जवळ जाऊ दिले नाही. त्यानंतर ती तिच्या घरी गेली. कंगनाला तीन दिवस क्वारंटाइन करण्यात आल्याने ती पाली हिल येथील कार्यालयात गेली नाही. विशेष परवानगी घेऊनच तिला घराबाहेर पडता येणार असल्याची माहिती देण्यात आली.

…म्हणून दिली क्वारंटाईनमधून सूट (so exempted from quarantine)

दुसऱ्या राज्यातून विमानप्रवास करून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा मुक्काम सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी असल्यास त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागते, असा राज्य सरकारचा नियम आहे. मात्र अभिनेत्री कंगना रणौत ही केवळ सहा दिवसांसाठी मुंबईत आहे. त्यामुळे तिला क्वारंटाईनमधून सूट दिल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी सांगितले.

‘संजय राऊत मुर्दाबाद, बीएमसी हाय हाय’

कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयाच्या गेटसमोर तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. ‘संजय राऊत मुर्दाबाद’, ‘बीएमसी हाय हाय’, ‘नही चलेगी.. नही चलेगी.. गुंडागर्दी नही चलेगी’, ‘बीएमसी चोर है’, ‘कंगना राऊत आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा अनेक घोषणा सतत दिल्या जात होत्या. मुख्य म्हणजे कोरोनाच्या पर्श्वभूमीवर कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम मोडू नयेत यासाठी प्रयत्नशील असलेल्या खार पोलिसांनाही जमावाने उद्धटपणे उत्तरे दिली. मात्र जमावाचा फायदा एखादा समाजकंटक घेऊ नये यासाठी पोलिसांची धडपड सुरूच होती.

५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या दोन्ही परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तींकडे पोलीस चौकशी करीत होते.