भारतात Friends: The Reunion ची हवा, एकावेळी १० लाखाहून अधिक प्रेक्षकांनी घेतला आनंद!

आश्चर्याची बाब म्हणजे त्याला देखील भारतीय प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अगदी पहिल्या नऊ तासांत तब्बल १० लाख लोकांनी पेड सबस्क्रिप्शन घेऊन ही मालिका पाहिली.

    फ्रेंड्स ही ९०च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक. हलके फुलके विनोद आणि सहा मित्र-मैत्रिणींनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. याच सुपरहिट मालिकेचं रियुनिअन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. फ्रेंड्स: द रियुनियन ही विशेष मालिका नुकतीच झी ५ वर प्रदर्शित झाली. अन् आश्चर्याची बाब म्हणजे त्याला देखील भारतीय प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अगदी पहिल्या नऊ तासांत तब्बल १० लाख लोकांनी पेड सबस्क्रिप्शन घेऊन ही मालिका पाहिली.

    झी डिजिटल बिझिनेस अँड प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली. “फ्रेंड्स द रियुनियनला झी ५ वर खूप व्हूज मिळाले आहेत, याचा आम्हाला खूप आनंद झाला. यात १० लाखाहून अधिक लोकांनी हा सिझन पाहिला आहेत आणि अद्याप ही मोजणी चालूच आहे. या शोच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी लाखो स्क्रीनवर हा शो प्ले केल्याचा आम्हाला अभिमान आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

    ‘फ्रेंड्स: द रियुनियन’चा संपूर्ण भाग १०४ मिनिटांचा आहे. यामध्ये जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वाइमर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. शिवाय जस्टीन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेलक, जेम्स मायकेल टायलर, मॅगी व्हिलर, रीझ विदरस्पून आणि मलाला यूसुफजई पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे फ्रेंड्स: द रियुनियनच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी मालिकेचे जुने लेखक, बॅक स्टेज आर्टिस्ट, आणि त्यावेळचे इतर सर्व कर्मचारी यांना एकत्र आणलं. जवळपास १८ वर्षानंतर या सर्वांनी एकत्र काम केलं.