‘गंगूबाई काठीयावाडी’ च्या शूटसाठी आलिया उत्सुक, पण भन्साळींचं १५ जूननंतर लागू होणाऱ्या नियमावलीकडे लक्ष!

१५ जूनपासून 'गंगूबाई'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

    संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठीयावाडी’ हा सिनेमा कोणत्या मुहूर्तावर सुरू झाला तेच समजत नाही. कारण या चित्रपटासमोरील संकटांची मालिका संपण्याचं नावच घेत नाही. सुरुवातीला वादात सापडलेल्या या चित्रपटाच्या कामात अडथळा निर्माण झाला. नंतर भन्साळी कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानं ब्रेक लागला.

    भन्साळी बरे होतात न होतात तोच टायटल रोल साकारणारी आलिया भट्टही कोरोनाग्रस्त झाली. ती बरी होऊन शूट सुरू करेपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊनच लागल्यानं ‘गंगूबाई’चं काम थांबलं. आता निर्बंध काहीसे शिथिल केल्यानं ‘गंगूबाई’ला दिलासा मिळणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. १५ जूनपासून ‘गंगूबाई’च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

    नवीन नियमावलीनुसार गर्दीसोबत डान्स किंवा शूट करण्याची परवानगी नाही. त्यामुळे भन्साळींचं लक्ष १५ जूननंतर लागू होणाऱ्या नियमावलीकडे लागलं आहे. नवीन नियमावलीमध्ये शूटिंगला पूर्णत: परवानगी मिळण्याची आशा आहे. त्यामुळं ‘गंगूबाई’ लवकरच पुन्हा सेटवर परतेल असं बोललं जात आहे.