गुलजारांचं नवं पाऊल, फ्रेंच क्रिएटिव्ह स्कूलच्या शास्त्रीय सल्लागार मंडळामध्ये झाली निवड

माझ्या कामामुळं शिक्षण क्षेत्रात भर पडणार असल्याचं पाहून मला आनंद होत आहे. सिनेमा क्षेत्रात अॅनिमेशन विषयाचं प्राबल्य वाढत असल्याचं मी दिग्दर्शक म्हणून अनुभवलं आहे.

    इंडस्ट्रीयल डिझाईन, गेम आणि अॅनिमेशन अशा विविध विषयांमध्ये कोर्सेस उपलब्ध करून देणाऱ्या रुबिका या अग्रेसर फ्रेंच क्रिएटिव्ह स्कूलच्या शास्त्रीय सल्लागार मंडळामध्ये प्रख्यात कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक गुलजार यांची निवड करण्यात आली आहे. रुबिका फ्रान्स या शैक्षणिक संस्थेच्या संपूर्णतः मालकीची असलेली रुबिका इंडिया आहे. व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधताना गुलजार म्हणाले की, गेमिंग आणि अॅनिमेशन या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि अध्यापनासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या रुबिका या प्रतिष्ठित संस्थेबरोबर जोडलो गेल्यामुळे मी खूप आनंदी आहे.

    अॅनिमेशन, नरेटिव्हस आणि स्टोरीटेलिंग विषयांमध्ये विद्यार्थ्यांना माझ्या अनुभवाचा फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. कविता आणि सिनेमा या क्षेत्रांमध्ये अधिकाधिक योगदान देण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्या कामामुळं शिक्षण क्षेत्रात भर पडणार असल्याचं पाहून मला आनंद होत आहे. सिनेमा क्षेत्रात अॅनिमेशन विषयाचं प्राबल्य वाढत असल्याचं मी दिग्दर्शक म्हणून अनुभवलं आहे.

    त्यामुळं अॅनिमेशनचा वापर करून विविध विषयांवर भाष्य करायला आणि ते विषय प्रभावी पद्धतीनं मांडण्यासाठी रुबिका संस्थेचं विद्यार्थी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. भावना आणि सृजन कौशल्यांचा वापर करून संबंधित विषय अॅनिमॅटिक एक्सप्रेशनद्वारे मांडण्यासाठी माझ्या कार्यातून काही तरुण-तरुणींना प्रेरणा मिळेल याचा आनंद आहे.