चुकीचं पाऊल, पण बदलाची चाहूल!

चित्रपटात कंडोमला हेल्मेटची उपमा देत अगदी हसत खेळत एक महत्त्वपूर्ण संदेश देण्याचं काम दिग्दर्शक सतराम रामाणी यांनी केलं आहे.

    काही वेळेस चांगलं काम करताना चुकून वाईट घडतं आणि अनर्थ ओढवतो, पण जर एखाद्या वाईट कामातून चांगलं घडलं तर दुष्कर्मही पुण्यकर्म ठरतं. ‘हेल्मेट’ या चित्रपटातही असंच काहीसं कथानक आहे. भारतीय जनतेसाठी आजही संवेदनशील असणाऱ्या विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. चित्रपटाचं टायटल ‘हेल्मेट’ हे प्रतिकात्मक आहे. हेल्मेट घातल्यानं अपघातात जास्त दुखापत होण्याची शक्यता कमी होते. हाच धागा पकडून या चित्रपटात कंडोमला हेल्मेटची उपमा देत अगदी हसत खेळत एक महत्त्वपूर्ण संदेश देण्याचं काम दिग्दर्शक सतराम रामाणी यांनी केलं आहे.

    चित्रपटाची कथा अपारशक्ती खुरानानं साकारलेल्या लकीभोवती गुंफण्यात आली आहे. लग्न समारंभांमध्ये वाजणाऱ्या बँडमध्ये गाणाऱ्या लकीचं श्रीमंत घरातील रुपाली (प्रनूतन बहल)नावाच्या मुलीवर प्रेम असतं. रुपालीचे वडील (आशिष विद्यार्थी) तिचं लग्न एनआरआयशी करणार असतात. त्यांना रुपाली आणि लकीचं नातं मान्य नसतं. रुपालीसोबत लग्न करण्यासाठी सुल्तान (अभिषेक बॅनर्जी) आणि मायनस (आशिष वर्मा) या दोन मित्रांसोबत लकी चोरी करण्याची योजना आखतो. तिघेही महागडे मोबाईल चोरून लखपती होण्याची योजना आखतात. ठरल्याप्रमाणं तिघेही एका कंपनीचा मालानं भरलेला ट्रक मोठ्या शिताफीनं लुटतात. त्यानंतर लुटलेला माल विकण्यासाठी त्यांना काय काय कसरत करावी लागते त्याची कहाणी या चित्रपटात आहे.

    चित्रपटाचा विषय खूप महत्त्वाचा आणि चांगला आहे. कंडोम वापराबाबत आज जरी शहरांमध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस आला असला तरी निमशहरी आणि गावाकडच्या काही भागांमध्ये अद्यापही कंडोम हा शब्द उच्चारणंही पाप मानलं जातं. या चित्रपटात दिग्दर्शकानं अशाच एका एरियातील कथा सादर केली आहे. ज्या ठिकाणी एड्स निर्मूलन संस्थेचे कर्मचारी कंडोमबाबत सर्व्हेही करू शकत नाही, तिथलं चित्र नंतर कसं बदलतं हे या चित्रपटात कोणतेही उपदेशाचे डोस न पाजता दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या कथेचा जीव फार छोटा असल्यानं दिग्दर्शकानंही फार खेचण्याऐवजी थोडक्यात आवरतं घेत, मेलोड्रामा करण्याचं टाळलं आहे. गाणी चांगली आहे. कॅमेरावर्क आणि इतर तांत्रिक गोष्टीही चांगल्या आहेत.

    बऱ्याच चित्रटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये दिसलेल्या अपारशक्ती खुरानानं मुख्य भूमिकेत उत्तम काम केलं आहे. त्याच्या जोडीला असलेल्या प्रनूतन बहलनंही चांगला प्रयत्न केला असला तरी अद्याप तिला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. अभिषेक बॅनर्जीनं आपल्या नेहमीच्याच स्टाईलमध्ये फटकेबाजी केली आहे. आशिष वर्मानंही चांगली साथ दिली आहे. आशिष विद्यार्थींचं कॅरेक्टर खूप छोटं असल्यानं त्यांना जास्त वाव नव्हताच. कलाकारांनी छान काम केलेला विविध पैलूंना स्पर्श करणारा हा चित्रपट गावागावात पाहिला गेला पाहिजे.