मुंबई उच्च न्यायालयाचा सोनी पिक्चर्सला दिलासा, ‘स्कॅम १९९२ – द हर्षद मेहता स्टोरी’ वेबसीरिजच्या प्रकरणात तुर्तास कारवाई न करण्याचे आदेश

‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’(Scam 1992- The Harshad Mehta Story) या सोनी लिव्ह(Sony Liv) ॲपवरील सोनी पिक्चर्सच्या वेब सीरिजमध्ये एका दृश्यात कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा लोगो वापरल्याचा आरोप करत बँकेने पुण्यातील सहकार नगर पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता, ट्रेडमार्क तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

    मुंबई : सोनी लिव्हवरील(Sony Liv) ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ (Scam 1992- The Harshad Mehta Story)या प्रसिद्ध वेबसीरिजच्या(Webseries) एका दृश्यावर आक्षेप घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे सोनी पिक्चर्स न्यायालयाची पायरी चढले आहेत. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्यांना तुर्तास दिलासा दिला देत सोमवारपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तोंडी निर्देश खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत.

    ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ या सोनी लिव्ह ॲपवरील सोनी पिक्चर्सच्या वेब सीरिजमध्ये एका दृश्यात कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा लोगो वापरल्याचा आरोप करत बँकेने पुण्यातील सहकार नगर पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता, ट्रेडमार्क तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. कारवाईच्या भीतीपोटी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्राईव्हेट लिमिटेड कंपनीने उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर शुक्रवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत प्राथमिक सुनावणी पार पडली.

    वेबसीरिजच्या प्रसारणादरम्यान कोणाच्याही हक्कांचे उल्लंघन होणार नसल्याची हमी निर्मात्यांकडून घेतली होती. तसेच वेबसीरिजचा कोणत्याही व्यक्तीशी वा संस्थेशी साम्य दिसल्यास तो योगायोग असल्याचे आम्ही प्रत्येक भागाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. त्यामुळे त्या दृश्यातून कोणाचीही बदनामी झाली नसून आमच्यावर कुहेतूने एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शानास आणून दिली. तसेच पोलिसांनी आमच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांचीही कलमे लावली असून कंपनीच्या प्रतिनिधीला अटक करण्याविषयी धमकावत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. आम्ही वेबसीरिजमध्ये बँक ऑफ कराज असे नामकरण केले आहे. आमचा कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची प्रतिमा मलीन करण्याचा कोणताही हेतू नाही. त्यामुळे पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करावा किंवा अंतिम सुनावणीपर्यंत त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. त्याची दखल घेत खंडपीठाने सोमवरापर्यंत याचिकाकर्त्यांविरोधात कोणतिही कठोर कारवाई न करण्याचे तोंडी निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

    १९९२ मध्ये हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँक ऑफ कराडचा सहभाग उघड झाला. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई केली होती. त्यानंतर १९९४ मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये बँकेचे विलीनीकरण झाले होते.ॲप्लॉज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निर्मिती असलेल्या ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज सोनी पिक्चर्सच्या सोनीलिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित करण्यात आली होती.