कंगनाला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, पासपोर्ट नुतनीकरणासाठी दाखल केला होता अर्ज!

`धाकड’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कंगनाला १५ जून ते ३० ऑगस्ट हंगेरीला रवाना व्हायचं आहे. मात्र तिचा पासपोर्ट सप्टेंबर २०२१ पर्यंतच वैध असल्याने तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात अडचणी येत आहेत.

   पारपत्र (पासपोर्ट) नुतनीकरणासाठी उच्च न्यायालयाची पायरी चढलेल्या अभिनेत्री कंगना राणौतला दिलासा देण्यास मंगळवारी न्यायालयाने नकार दिला. दाखल करण्यात आलेल्या अर्जात पासपोर्ट प्राधिकरणाला प्रतिवादी करण्याचे आणि त्यानुसार अर्जात बदल करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब केली.

  मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून मुनावर अली सय्यद या बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरने कंगणाविरोधात वांद्रे पोलीस स्थानकांत आयपीसी कलम 153(अ) अंतर्गत  वर्णद्वेषी टिप्पण करून समाजात जातीय तेढ निर्माण करणं, २९५(अ) अंतर्गत लोकांच्या धार्मिक भावना दुखावणं आणि १२४ (अ) अंतर्गत देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशद्रोह प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित करत पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यातच  `धाकड’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कंगनाला १५ जून ते ३० ऑगस्ट हंगेरीला रवाना व्हायचं आहे. मात्र तिचा पासपोर्ट सप्टेंबर २०२१ पर्यंतच वैध असल्याने तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात अडचणी येत आहेत. नियमानुसार, परदेशवारीसाठी परत येण्याच्या तारखेपासून  कोणत्याही व्यक्तीचा पासपोर्ट हा किमान सहा महिने वैध असणे आवश्यक असते अन्यथा त्या व्यक्तीला परदेशी जाण्याची परवानगी मिळत नाही. कंगनाची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे त्यामुळे चित्रपटाचे उर्वरित चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी कंगनाला तातडीने परदेशवारी करणे आवश्यक असल्याचे कंगनाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

  सदर याचिकेवर मंगळवारी न्या. प्रसन्ना वारळे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर व्हीसामार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, पासपोर्ट प्राधिकरणाने यासंदर्भात काही लेखी आक्षेप नोंदवला आहे का? अशी विचारणा खंडपीठाने याचिकाकर्त्यांकडे केली. तेव्हा, पासपोर्ट नुतनीकरणाचा फॉर्म भरताना तेथील अधिकाऱ्यांनी तोंडी आक्षेप घेतला असल्याचा दावा कंगनाच्यावतीने करण्यात आला. ऐकीकडे पासपोर्ट नुतनीकरण करण्यास अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगता आणि त्यासंदर्भात पासपोर्ट प्राधिकरणाकडून कोणताही लेखी आदेश अर्जात जोडलेला नाही. असे कसे चालेल?  पासपोर्ट नुतनीकरणासाठी राज्य सरकार आणि संबंधित पोलिसांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले मात्र, पासपोर्ट प्राधिकरणाला प्रतिवादी करण्यात आलेले नाही, मग आम्ही आदेश कोणाला द्यायचे, अशा शब्दात खंडपीठाने कंगनाला सुनावले आणि अर्जात योग्य त्या सुधारणा करून पासपोर्ट प्राधिकरणाला प्रतिवादी करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब केली.

  रंगोली चंडेल अर्जात नावं कशासाठी?

  अभिनेत्री कंगना रणौतने चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी परदेशात जायचे आहे म्हणून पासपोर्ट नुतनीकरणासाठी अर्ज दाखल केलेला असताना तिची बहिण रंगोली चंडेलचाही अर्जात समावेश का ? अशी विचारणा खंडपीठाने केली. कंगना व्यावसायिक कामासंदर्भात अर्ज करत आहे. मग बहिण रंगोलीला परदेशात कोणत्या कामासाठी अथवा परफॉर्मन्ससाठी जायचे आहे ? त्यांचा इथे संबंध काय ? असा सवालही खंडपीठाने यावेळी उपस्थित करत अर्जात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. 

  आयत्या वेळी अर्ज का ?

  खंडपीठाने पुढील सुनावणीची तारीख जाहीर केल्यानंतर सदर चित्रपटातील सर्व कर्मचारी अथवा इतर कलाकार याआधीच हंगेरीला पोहोचले आहेत. त्यामुळे पुढील सुनाणीसाठी लवकरची तारीख देण्यात यावी अन्यथा चित्रपटाच्या चित्रिकरणाचे काम रखडेल, अशी विनंती कंगनाच्यावतीने करण्यात आली. जर वेळापत्रकानुसार चित्रिकरण नियोजित होते तर आयत्या वेळी याचिका का दाखल केली ? तसेच पासपोर्ट प्राधिकरणाला प्रतिवादी न करता याचिकेची घाई का केली ? चित्रिकरणाच्या तारखा नव्याने ठरता येऊ शकतात त्यामुळे तारखांचे सबब पुढे करू नका, अशा शब्दात फटकारत खडंपीठाने कंगनाची मागणी फेटाळून लावली