‘स्तन बेंबीपर्यंत गेले तरी चालेल, पण ब्रा घालणार नाही’ हेमांगी कवीनंतर या अभिनेत्रीने मांडली भूमिका!

हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसनने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

    मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीची बाई..ब्रुब्स आणि ब्रा ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने चांगलेच सुनावले. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असून तिला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान एका हॉलिवूड अभिनेत्रीने यापुढे आयुष्यात कधीही ब्रा घालणार नसल्याचे म्हटले आहे.

    हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसनने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी ती म्हणाली की, ‘मी खूप आळशी आहे आणि यापुढे मी ब्रा घालणार नाही. माझे स्तन माझ्या बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील. पण मी ब्रा घालणार नाही’. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    गिलियनचा हा व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने ‘मी देखील या पुढे ब्रा घालणार नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘मी सुद्धा! १७ महिने घरुन काम केल्यानंतर… गिलियन तुझे अगदी बरोबर आहे’ असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने ‘गोल्डन ग्लोब आणि एमी अवॉर्ड जिंकणाऱ्या अभिनेत्रीने ब्रा न घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण असहमती दाखवणारे कोण आहोत’ असे म्हटले आहे.

    गिलियन अँडरसन ही ब्रिटीश-अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने ‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द माइटी’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलँड’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.