“जुम्मा चुम्मा दे दे गाणं गाण्यासाठी मी १७ तासांत २५ कप चहा प्यायलो होतो!”: सुदेश भोसले

मुंबई : लॉकडाऊननंतर पुन्हा प्रसारित होऊ लागलेल्या ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या रिॲलिटी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाची पकड पुन्हा एकदा घेतली आहे. आपल्या अप्रतिम आवाजाने त्यातील बालस्पर्धकांनी परीक्षक, ज्युरी आणि प्रेक्षकांवर आपला प्रभाव टाकण्यात कोणतीही कमतरता शिल्लक ठेवलेली नसली, तरी या कार्यक्रमात वेळोवेळी विशेष अतिथी म्हणून सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटी ताऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी कक्कर भावंडे, महान संगीतकार साजिद खान आणि कॉमेडीचा बादशहा सुपरस्टार गोविंदा हे विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते.

आता पुढील भागात अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक प्रसिध्द अभिनेत्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यासाठी विख्यात असलेले नकलाकार आणि पार्श्वगायक सुदेश भोसले यांचे हे लिटल चॅम्प्स विशेष अतिथी म्हणून स्वागत करणार आहेत. या कार्यक्रमातील या बालस्पर्धकांचा सुरेल आवाज ऐकून चकित झालेल्या सुदेश भोसले यांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा तर केलीच; पण ‘जुम्मा चुम्मा’ या अतिशय लोकप्रिय गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा एक अज्ञात किस्साही त्यांनी वर्णन केला.

झैद अलीने ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणे अफलातून पध्दतीने सादर केल्यावर सूत्रसंचालक मनीष पॉलने सुदेशजींना मंचावर बोलावून ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे विलक्षण लोकप्रिय गाणे गाण्याची विनंती केली. गेल्या अनेक पिढ्यांमध्ये हे गाणे लोकप्रिय ठरले आहे. सुदेशजींनी सहजतेने आणि तितक्याच जोशपूर्ण पध्दतीने हे गाणे गायलेच, पण त्या गाण्याची तालीम करीत असताना आणि त्याचे ध्वनिमुद्रण करीत असतानाच्या वेळचा एक भन्नाट किस्साही कथन केला.

त्या किश्शाची आठवण सांगताना सुदेश भोसले म्हणाले, “या गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी अंतिम तालीम सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झाली. मी तेव्हा नवखा होतो. आमचं ध्वनिमुद्रण होत होतं, त्याच्या शेजारच्याच स्टुडिओत अमितजींचं चित्रीकरण सुरू होतं आणि ते मधल्या ब्रेकमध्ये आमच्या इथे येत होते. मी तेव्हा नवखा असल्याने मला ते आले की दडपण येत असे. त्यामुळे त्या दिवशी मी काहीच खात नव्हतो. तेव्हा मी १७ तासांच्या अवधीत तब्बल २५ कप चहा प्यायलो. पण कविता कृष्णमूर्ती यांनी मला नैतिक आधार दिला. अखेरीस पहाटे २ वाजता या गाण्याचं अंतिम ध्वनिमुद्रण पार पडलं!” ही खरोखरच कौतुकास्पद बाब म्हटली पाहिजे!

त्यानंतर आमच्या परीक्षकांनी सुदेशजींना अनेक लोकप्रिय गाण्यांसाठी साथ दिली आणि सभागृहात मंत्रमुग्ध वातावरण निर्माण झाले. यावेळी सुदेशजींनी शावा शावा, चलाओ नैनों से बाण रे, इमली का बूटा बेरी का पेड वगैरे अनेक लोकप्रिय गाणी गायली.

सुदेश भोसले हे विशेष अतिथी असलेल्या या भागात अनेक गुणी बालस्पर्धकांनी अतिशय जोशपूर्ण आणि सुरेल आवाजात गीते सादर केली. सक्षम आणि सईचे ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ आणि ‘जय जय शिवशंकर’ ही गाणी सर्वांचं मन जिंकतील, तर गुरुकीरत आणि सौम्या यांच्या ‘एक मैं और एक तू’ आणि ‘देखा ना हाय रे’ ही गाणी सर्वांना ठेका धरायला लावतील. एकंदरीतच आगामी ‘किशोरकुमार आणि आरडी’ विशेष भागात प्रेक्षकांना अनेक संस्मरणीय आठवणींचे किस्से आणि अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळतील.

पाहा ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ शनिवार आणि रविवारी रात्री ८.०० वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!