‘इंडियन आयडॅाल’नं आशिषला दिली संगीताची श्रीमंती!

१२ वर्षांपूर्वी झी मराठीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये सहभागी होण्यापासून 'इंडियन आयडॅाल'मध्ये परफॅार्म करण्यापर्यंतचा सर्व अनुभव आशिषनं 'नवराष्ट्र'शी शेअर केला.

  सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर सुरू असलेल्या ‘इंडियन आयडॅाल’चं बारावं पर्व सध्या चांगलंच रंगात आलं आहे. सुरुवातीपासून आपल्या गाण्यानं मन मोहून घेणारा आशिष कुलकर्णी मागच्याच आठवडयात या शोमधून बाहेर पडला आहे. १२ वर्षांपूर्वी झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये सहभागी होण्यापासून ‘इंडियन आयडॅाल’मध्ये परफॅार्म करण्यापर्यंतचा सर्व अनुभव आशिषनं ‘नवराष्ट्र’शी शेअर केला.

  आशिषबाबत सांगायचं तर तो मूळचा पुण्यातील असून, बालपणापासून आई-बाबांचा पाठिंबा असल्यानंच गीत-संगीतात वाटचाल करत आहे. सारेगमप लिटील चॅम्प्सनंतरही तो मुकुंद फणसळकर यांच्याकडं गाणं शिकत राहिला. क्लासिकलसोबतच लाईट म्युझिककडे त्याचा ओढा वाढला. बरंचशी गाणी त्यानं ऐकून बसवली आहेत. स्वत: कम्पोज करू लागला. त्याचा ‘राग लॅाजिक’ नावाचा बँडही होता. ऐकून आणि रियाजावर भर देऊन आशिष गाणं शिकला. लहान-मोठे बरेच शोज करत सतत माईक समोर राहिला आणि यातूनच घडत गेला. यातूनच त्याचं गाणं हळूहळू इम्प्रूव्ह होत गेलं. आशिष छान गिटार वाजवतो. एमआयटी पुण्यात एमबीए करण्यापूर्वी त्यानं बीसीए केलं आहे. ‘इंडियन आयडॅाल’मधील अनुभवाबाबत तो म्हणाला की, ‘इंडियन आयडॅाल’मध्ये परफॅार्म करणं हा लाईफ चेंजींग अनुभव होता. सारेगमप लिटील चॅम्प्समध्ये सहभागी झालो होतो, तेव्हा खूप लहान होतो. फारसं काही समजत नव्हतं. कोणी गायला सांगितलं की गायचो. त्यावेळी भीती नव्हती, पण गाण्यात मॅच्युरीटीही नव्हती. ‘इंडियन आयडॅाल’मध्ये सहभागी होण्यापूर्वी बरीच वर्षे मी कोणताही रिअॅलिटी शो केला नव्हता. लॅाकडाऊनमध्ये म्युझिशियन्सना काही काम नव्हतं. देवाच्या कृपेनं आणि आई-वडीलांनी सांगितल्यानं मी एमबीए केलं आहे. त्यामुळं लॅाकडाऊनमध्ये जॅाब शोधू लागलो. एक जॅाब फायनल झाला आणि मी मुंबईला गेलो. त्याचवेळी बरोबर ‘इंडियन आयडॅाल’च्या आॅडीशन्स सुरू होत्या. सहज म्हणून आॅडीशन द्यायला गेलो आणि तिथून पुढे कायम सिलेक्टच होत गेलो. इतका मोठा मंच आणि एवढं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.

  या मंचानं आपल्यात खूप बदल घडवल्याचं सांगत आशिष म्हणाला की, ‘इंडियन आयडॅाल’नं माझ्यात खूप बदल घडवले. गायनात खूप बदल झाला. मला काही सिनेमांची गाणी येत होती, पण ती कशाप्रकारे सादर करायची ते समजलं. निरज काळकर, सचिन वाल्मिकी आणि मंगल मिश्रा यांनी मनापासून शिकवलं. गाणं समजावलं. गाणं बसवायचं म्हणजे काय? ते कसं ऐकायचं? शब्दांचं काय महत्त्व? टोन कसा बनवायचा? हे सांगितलं. मी परफॅार्मर असल्यानं त्याप्रमाणं व्हिज्युअलाइज करायचो. त्यातून माझा संपूर्ण अॅक्ट डिझाइन व्हायचा. सुरुवातीला हे करताना भीती वाटायची, पण हळूहळू आत्मविश्वास वाढलो. ते सगळं मला म्युझिकली रिच बनवणारं होतं. वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकली. पाठांतर पटकन होऊ लागलं. पर्सनॅलिटीत खूप सुधारणा झाली. आधीपासूनच मी खूप हम्बल होतोच, पण इथं आल्यावर कॅाम्प्लिमेंटस कशा रिसीव्ह करायच्या, क्रिटीक्सचं सजेशन कसं स्वीकारायचं, त्यावर काम करून कसं इम्प्रूव्ह करायचं या गोष्टी समजल्या.

  इथं सर्वच ब्रिलियंट आहेत
  ही जरी स्पर्धा असली तरी आमच्यात कॅाम्पिटीशनची भावना कधी नव्हतीच. माझं दानिशच्या गाण्यावर प्रेम आहे तितकंच पवनच्याही आहे, अरुणीता, निहाल, शन्मुखप्रिया आणि सायलीच्याही आहे. सगळे युनिक आणि ब्रिलियंट असल्यानं एकमेकांना हरवण्यासाठी कुणी गातच नव्हतं. आम्ही सर्वच म्युझिकप्रेमी आहोत. एखाद्यानं चांगलं गाणं गायलं की सर्वच कौतुक करायचे. मी जेव्हा स्टेजवर असायचो, तेव्हा माझं गाणं चांगलं होण्यासाठी सायली आणि शन्मुखप्रिया देवाकडे प्रार्थना करायचे. संगीताचा मान राखत आम्ही छान शो देण्याचा प्रयत्न केला. कोण जिंकणार आणि कोण ‘इंडियन आयडॅाल’ बनणार याकडं फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. त्यामुळंच ६६ एपिसोड मी होतो तेव्हा जिंकण्याचा नव्हे तर चांगलं गाणं गाण्याचा प्रयत्न केला.

  रेखाजींनी केलं कौतुक
  रेखा मॅडमनी मला खूप छान कॅाम्प्लिमेंटस दिल्या. त्यांच्यासमोर मी ‘राफ्ता राफ्ता…’ आणि ‘नदिया से दरीया…’ ही गाणी गाणार होतो. ‘राफ्ता राफ्ता…’ हे गाणं अत्यंत परफॅार्मंसचं गाणं होतं. त्यामुळं त्या गाण्याबद्दल खूप एक्साइटमेंट होती. रेखा मॅडमसारख्या मोठ्या अभिनेत्रीकडून त्यावर कमेंट जाणून घ्यायला उत्सुक होतो. त्यांनी माझं खूप कौतुक केलं. कोणतंही दिग्गज व्यक्तिमत्त्व आलं की त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांना त्या काळात नेण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्याकडं होती. धरमसर आले होते तेव्हाही खूप चांगली गाणी गायलो. आम्ही त्यांचे ओरिजनल व्हिडीओज पाहून तसे मुव्हमेंट्स डिझाइन करायचो. त्यामुळं त्यांच्यासमोर गाताना काहीतरी वेगळं करतोय असं वाटत नसायचं. किशोरदा, लतादीदी, आशाताई हे इतके मोठे कलाकार आहेत की त्यांच्याइतकं एक टक्के जरी करता आलं तरी खूप मोठी गोष्ट आहे.

  रेहमानसरांची कौतुकाची थाप
  माझा सर्वात आवडता एपिसोड ए. आर. रेहमानसरांचा आहे. त्यांच्यासमोर गाणं गायचं हे लहानपणापासून स्वप्न होतं. ते  साकार झालं. रेहमानसर फार बोलत नाहीत, पण त्यांनी कॅाम्प्लिमेंट्स दिल्या तोच आशीर्वाद आहे. माझ्याबद्दल कौतुकाचे चार शब्द बोलले हीच खूप मोठी गोष्ट होती. जे जुने संगीतकार आले त्यांनी आम्हा सर्वांवर खूप प्रेम केलं. कुमार सानू आणि उदित नारायण यांचा मी खूप आवडता होतो. ‘कुलकर्णीजी वाह क्या गा रहे हो’, ही त्यांची वाक्यं कायम स्मरणात राहतील. आनंदजीभाई माझ्याशी मराठीत बोलले. त्यांनी घरी बोलावलं आहे. माझ्याकडे कार्यक्रम असेल तेव्हा गा असं म्हणाले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल एपिसोडमध्ये ‘जुम्मा चुम्मा…’ या गाण्याचं कौतुक झालं. अमित कुमारांनीही पाठीवर कौतुकाची थाप मारली. म्युझिशियन्सना माझं गाणं खूप आवडलं ही माझ्यासाठी कौतुकास्पद बाब होती. परीक्षक नेहमी मोटीव्हेट करायचे. आॅनस्क्रीन ते कौतुक करायचेच, पण आॅफस्क्रीनही बऱ्याच गोष्टी समजावून सांगायचे. मागच्या एपिसोडचा रेफ्रन्स देत सुधारणा करायला सांगायचे किंवा चांगलं झालं असेल तर शाबासकी द्यायचे. नेहा कक्कर, विशाल ददलानी, अनू मलिक, सोनू कक्कर आणि हिमेश रेशमियासरांनी खूप काम केलं आहे. हिमेशसरांसोबत लवकरच गाणं येईल.

  संगीतकार पवन-आशिष!
  भविष्यात लोकांपर्यंत जास्तीत जास्त गाणी पोहोचवायची आहेत. पवनसोबत गाण्यांना संगीत द्यायचं आहे. पवन-आशिष या जोडीनं संगीतबद्ध केलेली गाणी चित्रपटांच्या माध्यमाततून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर संगीतकार म्हणून संधी मिळावी ही इच्छा आहे. पवन खूप सिन्सिअर आहे. मला सख्ख्या भावासारखा आहे. खूप मेहनती आहे. त्याला बरीच वाद्यं वाजवता येतात. आमचं खूप प्युअर रिलेशन आहे आणि ते तसंच रहावं अशी इच्छा आहे. माझी स्वत:ची गाणी रसिकांच्या भेटीला आणायची आहेत. पार्श्वगायन करायचं आहे. प्रीतम, शंकर-एहसान-लॅाय यांसारख्या मोठ्या संगीतकारांसोबत काम करण्याची इच्छा आहे.

  एकही अश्रू येऊ द्यायचा नव्हता…
  इंडियन आयडॅालमधून बाहेर पडल्यावर दोन दिवस भयंकर वाईट वाटलं. सगळेजण खूप रडले. स्पॅाटदादांपासून साऊंड टीमपर्यंत सर्वच माझ्यासाठी रडले. इमोशनल बॅाडींग खूप छान झालं होतं. एका बाजूला शन्मुखा आणि दुसऱ्या बाजूला सायली अक्षरश: ढसाढसा रडत होत्या. तिकडे पवन, निहाल आणि दानीशही रडत होते. आपलं नाव जर घेतलं तर डोळ्यांतून एकही अश्रू येऊ द्यायचा नाही हे मी ठरवलं होतं, पण त्यांच्यामुळं मी स्वत:ला सावरू शकलो नाही. आम्ही एका फॅमिलीसारखे होतो. एका परिवाराची भावना असल्यानं सर्वांना खूप वाईट वाटलं. शेवटी स्पर्धा आहे. ही इतकी सकस आहे की हरावं तर अशा सिंगर्सकडून हरावं इतके ते ब्रिलियंट आहेत. या मंचावर स्वत:ला सिद्ध करण्याची समान संधी दिली जाते. त्यामुळं मुळीच पक्षपात केला जात नाही. जो जातो तो आगच लावून येतो. त्यामुळं कोणाला काढावं हे अवघड काम बनतं.