नवी चेतना देण्यासाठी जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचा पुढाकार

नाट्यहितासाठी स्थापन झालेल्या जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने नाट्य व्यवसायाच्या सक्षमीकरणासाठी काय करता येईल? या दृष्टीने रूपरेषा आखायला सुरुवात केली आहे.

मुंबई : नाट्यहितासाठी स्थापन झालेल्या जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने नाट्य व्यवसायाच्या सक्षमीकरणासाठी काय करता येईल? या दृष्टीने रूपरेषा आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक रंगभूमीला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने काय करता येऊ शकेल यासंदर्भात जाणून घेण्यासाठी नुकतेच एका झूम मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय असणारे डॉ.अनिल बांदिवडेकर, अभिजीत झुंजारराव, शुभांगी दामले, विजयकुमार नाईक, गिरीश पतके, तुषार भद्रे, सुनील गुरव, आशीर्वाद मराठे, प्रवीण काळोखे, वीणा लोकूर, सतीश लोटके, मुकुंदराव पटवर्धन अशा ७० हून अधिक प्रायोगिक नाट्यकर्मींसोबत जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर व निर्माता प्रशांत दामले, अनंत पणशीकर, श्रीपाद पद्माकर या सदस्यांची चर्चा झाली. प्रायोगिक रंगभूमीसाठी नेमकं काय करणं आवश्यक आहे? व काळानुरूप त्यात काय बदल अपेक्षित आहेत? याविषयी सकारात्मक चर्चा या मिटिंगमध्ये झाली.

या चर्चेअंतर्गत प्रायोगिक नाटकांना जागा मिळणे, प्रयोगांना शनिवार रविवारच्या तारखा मिळणे, राज्य नाट्य स्पर्धेतल्या सहभागींना राज्य शासनाकडून परतावा व प्रवासामध्ये सवलत तसेच ग्रामीण भागातील नाटकांच्या अनुदान प्रक्रियेचे सुलभीकरण करणे तसेच सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा नव्याने विचार करणे हे मुद्दे प्रामुख्याने पुढे आले. या मुद्द्यांसोबतच छोट्या शहरांत किंवा महानगरात होणाऱ्या प्रायोगिक नाटकांच्या महोत्सवाला ‘कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप’ मिळवून देण्याच्या दृष्टीने मदत करण्याचा विचार व प्रायोगिक नाटकं अधिकाधिक प्रेक्षकांपर्यत पोहचवण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये प्रेक्षकांची संघटना उभारणे, नाटकांचे योग्य ते संग्रहीकारण अशा वेगळ्या कल्पना देखील या चर्चेत मांडल्या गेल्या. 

प्रायोगिक नाटकांच्या वृद्धिगंतेसाठी नाट्यगृहां व्यतिरिक्त वेगवेगळ्या उपक्रमांच्या मार्फत जास्तीजास्त मार्ग उपलब्ध करून देत ‘प्रोसेस आणि प्रोटेक्ट’ यांचा योग्य तो समन्वय साधत यंत्रणा उभारणीची आवश्यकता ही या चर्चेत बोलून दाखवण्यात आली. राज्य नाटकांसाठी पालिका स्तरावर असणारा सांस्कृतिक निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व पालिकेतर्फे या नाटकांचा महोत्सव भरून तिकीट विक्रीतून येणारे निम्मे उत्पन्न संबधित संस्थेला मिळवून देण्याच्या योजनेचा मुद्दा ही यात चर्चिला गेला. व्यक्तीकेंद्री विचार न करता दबाव गटाच्या माध्यमातून प्रायोगिक रंगभूमीसाठी योजना आखून त्या पूर्णत्वास नेणे व जागतिक रंगभूमीवर काय चालले आहे याचा अदमास घेत सर्जनशीलतेला वाव देत प्रायोगिकतेच्या संकल्पना विस्ताराची व बालरंगभूमीच्या सक्षमीकरणाची गरज यावेळी अधोरखित करण्यात आली.

प्रायोगिक रंगभूमीचा प्रथमच एवढा गांभीर्यपूर्वक विचार करत तत्परतेने चर्चा घडविल्याबद्दल सक्रीय प्रायोगिक नाट्यकर्मींनी जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे आभार मानले. अशा चर्चा वारंवार व्हाव्यात या प्रस्तावासाहित प्रायोगिक नाट्यकर्मी निर्मात्यांचा एक संघ करून त्यातला एक प्रतिनिधी जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाशी प्रातिनिधिक स्वरुपात चर्चा करेल अशा ठराव यावेळी मांडला. उपस्थित नाट्यकर्मींनी केलेले मार्गदर्शन व चांगल्या बदलासाठी केलेल्या सूचनांची योग्य ती दखल घेत भविष्यात रंगभूमीला पुढे नेण्याच्या दृष्टीने काम करण्याची ग्वाही जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या चर्चेच्यावेळी दिली.