Ram Pyare Sirf Humare “प्रभू रामचंद्राच्या वेशभूषेत येण्यासाठी तीन तास लागले!” : निखिल खुराणा

मुंबई : देशभरात पसरलेल्या ‘कोविड-१९’ विषाणूच्या साथीमुळे सध्या वातावरणात अनिश्चितता आणि निराशेचे सावट आले असून त्यामुळे प्रेक्षकांची मन:स्थिती सुधारून त्यांना हसविण्याची आणि त्याद्वारे मनावरील ताण हलका करण्याची गरज असल्याचे ‘झी टीव्ही’ Zee Tv ने ओळखले आहे. त्यामुळेच आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना ‘झी टीव्ही’ने आपली पहिलीच नवी मालिका सादर केली आहे. तिच्या हलक्याफुलक्या सादरीकरणामुळे आणि विनोदी शैलीमुळे संपूर्ण कुटुंबाला ती हसवीत ठेवील.

‘राम प्यारे सिर्फ हमारे’ (Ram Pyare Sirf Humare) नावाच्या या विनोदी मालिकेचे कथानक भोपाळमध्ये घडते. ही कथा दुलारी (ज्योती शर्मा) ही तरुणी आणि तिचा आवडता पती राम यांच्याभोवती फिरते. या मालिकेच्या प्रसिध्दीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रोमोच्या चित्रीकरणासाठी नायक निखिल खुराणाने मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामाचा वेश धारण केला होता. त्यातून तो या मालिकेतील आपल्या व्यक्तिरेखेचे चरित्र अधोरेखित करणार होता. या प्रोमोत त्याने रामाच्या वेशातच आपल्या पत्नीसह स्कूटरही चालविली! त्याचा रामाचा वेश हा नेहमीसारखा दिसत असला, तरी त्याची रंगभूषा करण्यासाठी त्याला तब्बल तीन तास लागले होते!

आपल्या या रूपाबद्दल निखिलने सांगितले, “माझ्या रंगभूषाकारांना माझ्या संपूर्ण शरीराला रंग फासण्यासाठी आणि मला रामाच्या रूपात तयार करण्यासाठी तब्बल तीन तास लागले. वैयक्तिकरीत्या मला स्वत:ला अंगावर खूप कपडे घालायला आवडत नाहीत आणि मी खूप मेक-अपही करीत नाही. पण या भूमिकेसाठी हे सर्व करणं गरजेचं होतं. रामाचं रूप चढविण्यास आणि नंतर ते उतरविण्यासही प्रत्येकी तीन तास लागले. मी अभिनेता असल्यानेच मला ते जमलं. कलाकार अनेक भूमिका वठवीत असतात आणि त्या रंगविताना त्यांना असे अनेक रंजक अनुभव येतात.”

‘राम प्यारे सिर्फ हमारे’ या मालिकेच्या कथानकाच्या केंद्रस्थानी आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा राम असून तो भोपाळमध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लर चालवीत असे. तो आपल्या कामात पारंगत आणि यशस्वी असला, तरी त्याचा सहवास मिळावा, यासाठीही अनेक महिला त्याच्या ब्युटी पार्लरला भेट देत असत. अर्थात राम हा प्रभु रामचंद्राप्रमाणेच मर्यादा पुरुषोत्तम असून तो या महिलांच्या लाघवी आणि लागट वर्तनाला वेळीच रोखत असतो. दुलारीच्या दृष्टीने रामवर पाघळणार्‍्या या महिला म्हणजे ‘शूर्पणखा’ असतात! या शूर्पणखांच्या कचाट्यातून आपल्या रामाला सुरक्षित ठेवण्यासाठी दुलारी रामलाही अनेक सूचना आणि युक्त्या सांगते. कारण तिचे ध्येय एकच असते- ‘राम प्यारे सिर्फ हमारे’!

तिचा भाऊ पतंग याने तिला आपला नवरा सुरक्षित राखण्यासाठी कोणत्या युक्त्या अवलंबायच्या याची माहिती देणारे एक पुस्तक दिलेले असते. दुलारी त्यातील विविध उपाय योजते आणि त्यामुळे कधी कधी रामच अडचणीत येतो. तरीही या पुस्तकातील नवनव्या क्ऌप्त्या वापरण्याचे काही ती सोडत नाही. त्यातच कोयल ही राम आणि दुलारी यांच्यात बेबनाव निर्माण करून त्यांना विभक्त करण्याचा आणि नंतर रामला आपल्या नादी लावण्याचा कट करीत असते. सुदैवाने दुलारीला कोयलच्या या दुष्ट हेतूंची कल्पना आलेली असते. त्यामुळे रामच्या जवळ जाण्याच्या कोयलच्या नवनव्या बहाण्यांना ती आव्हान देते.

राम आणि दुलारीची ही विनोदी कथा पाहा आणि इतर बायकांपासून आपला नवरा सुरक्षित राखू शकते का, ते जाणून घेण्यासाठी लवकरच पाहा ‘राम प्यारे, सिर्फ हमारे’ फक्त ‘झी टीव्ही’वर!