खूप जवळच्या लोकांना कोरोनामुळे जाताना पाहिले आहे….रिंकू राजगुरूने चाहत्यांना केली कळकळीची विनंती!

मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. आमच्या इथले काका वारले. माझ्या खूप जवळच्या लोकांना कोरोनामुळे जाताना पाहिले आहे. काही जण सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याच्यामुळे या व्हायरसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

    देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाउन जाहिर करण्यात आला आहे. सध्या शूटिंगदेखील बंद आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी रिंकूने आपल्या जवळ्या व्यक्तीच्या निधनानंतर किती त्रास होते हे ही सांगितले आहे.

    रिंकू म्हणते, सध्या खूप विचित्र परिस्थिती आहे. काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो. ज्याला आपण परवा भेटलो आहे आणि अचानक रात्री फोन येतो की तो आपल्यात राहिला नाही. हे खूप भयानक आणि भीतीदायक आहे. जेव्हा माणून या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हाच त्याला कळतं. इतकी भयानक परिस्थिती असतानाही काही लोक वेड्यासारखी वागत आहेत. कोरोना वगैरे काही नसतं, मास्क लावणार नाही, असे म्हणणाऱ्या लोकांना इतकेच सांगायचे आहे की असे बेजाबदार वागू नका.

    मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. आमच्या इथले काका वारले. माझ्या खूप जवळच्या लोकांना कोरोनामुळे जाताना पाहिले आहे. काही जण सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याच्यामुळे या व्हायरसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे मास्क घालणे, हात सतत सॅनिटाइज करणे, स्वतःची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. दुसरे आपले काळजी घेणार नाहीत. त्यामुळे इतके जरी केले तरी खूप आहे. विनाकारण घराबाहेर पडले नाही पाहिजे.

     

    विनंती करते…

    १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाही आता कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यामुळे ती सगळ्यांनी लस घ्यावी. लस घेऊन या भ्रमात राहू नये की लस घेतली तर आता आपल्याला कोरोना होणार नाही. त्यामुळे सर्वांनी खूप काळजी घ्या, अशी रिंकूने सर्वांना कळकळीची विनंती केली आहे.