आता उत्सुकता ‘जय भवानी जय शिवाजी’ची, लवकरच मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

दशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या भव्यदिव्य मालिकेविषयी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचंच नव्हे, तर आपल्या देशाचं आराध्य दैवत.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांची शौर्यगाथा सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. या मालिकेत नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांनी गाजवलेला पराक्रम पहायला मिळणार आहे.

    स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या या लवढय्यांच्या शौर्याला समर्पित असलेल्या या मालिकेत भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून, अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे, तर कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे. दशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या भव्यदिव्य मालिकेविषयी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचंच नव्हे, तर आपल्या देशाचं आराध्य दैवत.

    महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती, ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अशा शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ सादर करताना अभिमान वाटतो आहे.