कंगनाला न्यायालयाकडून दिलासा;  बजावण्यात आलेले वॉरंट रद्द करून न्यायालायाने जामीन केला मंजूर

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात रिपब्लिकच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप केला होता. तसेच दिग्दर्शक महेश भट आणि अख्तर यांचा नावाचा थेट उल्लेख केला होता.

    मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून कंगनाला दिलासा मिळाला आहे. गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीमध्ये कंगना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहिल्याने न्यायालयाने कंगनाला बजावलेले वॉरंट रद्द केले आणि जामीनही मंजूर केला.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात रिपब्लिकच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप केला होता. तसेच दिग्दर्शक महेश भट आणि अख्तर यांचा नावाचा थेट उल्लेख केला होता. या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसतानाही माझ्यावर खोटे आणि अर्थहीन आरोप कंगनाने केले आहेत.

    यामुळे माझी विनाकारण बदनामी झाली असून त्याचा मला प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी याचिकेतून केली आहे. तसेच आयपीसी कलम ४९९ आणि ५०० नुसार अब्रुनुकसानीचा खटलाही दाखल करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

    तेव्हा, कंगना वैयक्तिक कारणांमुळेही सुनावणीस हजर राहू न शकल्यामुळे नाराजी व्यक्त करत न्यायालयाने कंगना विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानुसार गुरुवारी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयासमोर कंगना प्रत्यक्ष हजर राहिल्यामुळे न्यायालयाने तिच्याविरोधात बजावलेला वॉरंट रद्द करत तिला जामीन मंजूर केला. त्यामुळे आता कंगनाला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात होणाऱ्या नियमित सुनावणीला अनुपस्थित राहता येणार आहे.