जावेद अख्तर अब्रू नुकसान प्रकरणी बजावलेल्या समन्सला कंगनाचे दिंडोशी न्यायालयात आव्हान

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टार सोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली. मात्र, या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत.

    मुंबई : गीतकार जावेद अख्तर अब्रुनुकसान प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून बजावण्यात आलेल्या समन्सला अभिनेत्री कंगना रणौतने दिंडोशी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी सुनावणी पार पडणार आहे.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टार सोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली. मात्र, या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत.

    यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली. तसेच आयपीसी कलम ४९९ आणि ५०० नुसार अब्रुनुकसानी केल्याचा खटलाही दाखल करण्याची मागणी अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

    त्यावर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दंडाधिकारी आर. आर. खन्हद यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई पोलिसांनी आपला चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर केला. मात्र, कंगनाचा यासंदर्भात जबाब नोंदवणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने कंगनाला समन्स जारी केले होते. त्याविरोधात कंगानाने आता दिंडोशी न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.