कंगनाला दिलासा नाहीच; जावेद अख्तर यांच्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास सत्र न्यायालयाचा नकार

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास सोमवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिला आणि कंगना रणौतने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात रिपब्लिकच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप केला होता. तसेच दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांचा नावाचा थेट उल्लेख केला होता.

    मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास सोमवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिला आणि कंगना रणौतने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात रिपब्लिकच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप केला होता. तसेच दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांचा नावाचा थेट उल्लेख केला होता.

    या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसतानाही माझ्यावर खोटे आणि अर्थहीन आरोप कंगनाने केले आहेत. यामुळे माझी विनाकारण बदनामी झाली असून त्याचा मला प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी याचिकेतून केली आहे.

    तसेच आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसानीचा खटलाही दाखल करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर दिंडोशी सत्र न्यायालयात शनिवारी कंगनाच्या अर्जावर सुनावणी पार पडल्यानंतर न्यायाधीश एस.यु बगाले यांनी आपला निकाल राखून ठेवला होता. तो सोमवारी जाहीर करताना अंधेरी न्यायालयात जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास नकार देत कंगनाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णायामुळे कंगना आता उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.