kangana

दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिसांनी जमा केलेले साक्षीदारांचे जबाब हे बेकायदेशीर असल्याचे जाहीर करून दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या कारवाईवर स्थगिती द्यावी अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.

    बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती देण्यात यावी तसेच ती रद्द करावी अशी मागणी कंगनाने याचिकेमार्फत केली आहे.

    कंगनाने दाखल केलेल्या याचिकेमध्ये तिच्याविरोधात दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले आदेश आणि सर्व समन्सला तसेच सुरू केलेल्या कारवाईलाही अँड. रिझवान सिद्दिकीमार्फत आव्हान दिले आहे. तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांनी जुहू पोलिसांना तक्रारींबाबत चौकशीचे निर्देश देण्याऐवजी, तक्रारदार अख्तर आणि साक्षीदारांच्या साक्षींची पडताळणी करणे आवश्यक होते, असे याचिकेतून नमूद केले आहे. तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांनी उघडपणे पोलीस यंत्रणेचा वापर करून बेकायदेशीररित्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत असा आरोपही कंगनाने याचिकेतून केला आहे. यामुळे आरोपींच्या अधिकारांचे रक्षण कऱण्यास दंडाधिकारी अपयशी ठरले असून आरोपींच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर गदा आल्यासारखे असल्याचेही कंगनाने म्हटले आहे. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिसांनी जमा केलेले साक्षीदारांचे जबाब हे बेकायदेशीर असल्याचे जाहीर करून दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या कारवाईवर स्थगिती द्यावी अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. सदर याचिकेवर लवकरच न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

    एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने जावेद अख्तर यांनी त्यांच्या घरी बोलावून ऋतिक रोशन प्रकरणात आपल्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांचा आवाज खूप जास्त चढला होता, त्यामुळे आपला थरकाप उडाला असल्याचा दावा कंगनाने मुलाखतीत केला होता. कंगनाची बहिणी रंगोलीनेही याला दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट केल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी आता कायदेशीर मार्ग स्वीकारत दिंडोशी सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याची दखल घेत यावर्षी मार्च महिन्यात अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाने रणौतला जामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर कंगनाने न्यायालयात उपस्थित राहून जामीन मंजूर केला होता. तर एप्रिल महिन्यात कंगनाने दिंडोशी सत्र न्यायालयात या वॉरंटविरोधात धाव घेतली, मात्र तिची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर कंगनाने प्रत्यक्ष उपस्थित राहण्याविरोधात मागणी केली होती. ती अदयापही न्यायप्रविष्ट आहे.