अनिल देशमुखांनी राजीनामा देताच अभिनेत्री कंगना राणावतला झाली ‘त्या’ व्हिडिओची आठवण, शेअर करत म्हणाली…

 कंगनाने स्वतःदेखील हा व्हिडीओ ट्विट करत, ‘जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आणखी कायकाय होते..’ असे म्हटले आहे. यावर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत

    महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने अनिल देशमुखवर निशाणा साधला आहे.

    कंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर २०२० मधील कंगनाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील घराची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने व्हिडीओद्वारे महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती.

     

    कंगनाने स्वतःदेखील हा व्हिडीओ ट्विट करत, ‘जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आणखी कायकाय होते..’ असे म्हटले आहे. यावर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

    कंगना राणावत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. २०२० मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी कंगनाला येथे राहण्याचा काहीही अधिकार नाही. असं म्हटलं होतं.