या ‘इमोशनल ब्लॅकमेल’चं काय करायचं?; कंगनानं शेअर केला व्हिडिओ

मुंबई : महाराष्ट्रात सध्या कंगना राणावत विरुद्ध संजय राऊत असा वाद सुरू आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बॉलिवूड क्विन कंगनानं सातत्यानं मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर मिळाले. त्यात कंगनानं मुंबई पोलिसांवर टीका करताना मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर वाटू लागलं आहे, असे वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर तिच्यावर टीका होऊ लागली. त्यातही कंगनानं ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिम्मत असेल, तर अडवा असं आव्हान शिवसेनेला दिले. कंगनानं दिलेल्या या आव्हानामुळे मात्र तिच्या वडिलांना चिंता वाटू लागली आहे. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावरून कंगनानं एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यावर लिहिलं की, या ‘इमोशनल ब्लॅकमेल’चं काय करायचं?

कंगनाला सुरक्षा पुरवा

ऐकिकडे कंगना अशी विधानं करत सुटली असताना, तिच्या वडिलांना मात्र तिच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे. कंगनाचे वडील अमरदीप सिंह राणावत यांनी कंगनाच्या सुरक्षिततेसाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. मुंबईत जाण्यावरून त्यांनी कंगनाशी चर्चाही केली. कंगनाला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. कंगनाच्या सुरक्षिततेच खाजगी सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

कंगनानं शेअर केला व्हिडिओ…

कंगनानं व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं की,”तुम्ही माफियाशी लढू शकता, तुम्ही सरकारला आव्हान देऊ शकता, परंतु घरातील या इमोशनल ब्लॅकमेलला तुम्ही कसे हाताळू शकता? आज माझ्या घरी हेच घडलं…

कंगनानं शेअर केलेल्या व्हिडीओत तिचे वडील म्हणत आहेत की,”आपल्याला कोणाशी पंगा घ्यायचा नाही. मला रात्री झोप आली नाही. रात्री १२ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत मी झोपलो नाही.”

भाजप नेत्याने दिला पाठिंबा

शिवसेनेचे नेते कंगनाला आव्हान देत असताना हिमाचल प्रदेशमधील भाजपाचे आमदार कर्नल इंद्र सिंह यांनी जोरदार टीका केली आहे. सरकाघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार कर्नल इंद्र सिंह यांनी मुंबई कुणाच्या बापाची मालमत्ता नाही, असे विधान केलं आहे. ते पुढे म्हणाले,”मुंबईत जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा शिवसेना व संजय राऊत कुठे होते? देशातील प्रत्येक कोपऱ्यातील वीरांनी तेव्हा मुंबईसाठी प्राणाची आहुती दिली. मुंबईवर सर्वांचा हक्क आहे. कंगनाला धमकी देऊन संजय राऊत यांनी त्यांच्या संकुचित मानसिकतेची प्रचिती दिली. कंगना वाघिण आहे, गिधाडं तिचं काही बिघडवू शकत नाहीत.”