kaun banega crorepati 12 amitabh bachchan said that kbc was helped him in recover from debt
...म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास आहे केबीसी

  • २० वर्षांपूर्वी ९० कोटी रुपयांचं झालं होतं कर्ज
  • केबीसीनेच त्यांची आर्थिक तंगी दूर करण्यात मोलाचा हातभार लावला होता

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक मुलाखतींमध्ये (interview) हे स्पष्ट केलं आहे की, आपल्या जीवनात केबीसी (KBC) कधीही विसरू शकणार नाहीत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अमिताभ यांना देणेकरी धमक्या, शिव्यांची लाखोळी वाहत होते, तेव्हा त्यांच्यावर प्रतिक्षा बंगला (Pratiksha Banglow) सहारा फायनान्सकडे (sahara finance) गहाण ठेवण्याची नामुश्की ओढवली होती.

'कौन बनेगा करोडपती'चा १२ वा सीझन आज(२८ सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. यावेळी कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या महामारीमुळे या शोमध्ये ऑडियन्स दिसणार नाहीत. पण, ७७ वर्षांचे असलेले बच्चन बिनधास्त कंटेस्टंट सोबत शुटिंग करत आहेत. या शोच्या प्रति असलेल्या आत्मीयतेचे कारण हेही आहे की, २० वर्षांपूर्वी ९० कोटी रुपयांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी याच शोने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

पहिल्या सीझनच्या ८५ एपिसोडमधून १५ कोटी रुपयांची कमाई Amitabh Bachchan

बिग बी ने एका मुलाखतीत केबीसीबाबत म्हटले होते, हा शो अशावेळी माझ्याकडे आला जेव्हा मला याची जास्त गरज होती. व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या याने महत्त्वाची भूमिका केली. माझ्यावर विश्वास ठेवा. या शो मुळेच मला देणेकऱ्यांचे पैसे चुकते करण्यासाठी मोलाची मदत झाली आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, पहिल्या सीझनच्या ८५ एपिसोडमुळे बिग बी यांनी १५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

कुटुंबाची तयारी नव्हती, तर बिग बींचे मन तयार होत नव्हते KBC

ज्यावेळी अमिताभ यांनी या शोची ऑफर आली त्यावेळी अमिताभ यांनी छोट्या पडद्यावर काम करू नये अशी इच्छा त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी व्यक्त केली होती. टीव्हीवर काम केल्याने त्यांचा दर्जा घसरेल अशी भीतीही या सर्वांनी व्यक्त केली होती. स्वत: बिग बी यांचे मनही या गोष्टीसाठी तयार होत नव्हतं.

बिग बी यांची मनधरणी करण्यासाठी शो ची टीम त्यांना लंडनला घेऊन गेली आणि या शोचे ओरिजनल (युके) व्हर्जन ‘हु वांट्स टू बी अ मिलियनेयर’ च्या सेटवर एक दिवस व्यतीत करून सर्व बाबी त्यांच्या डोळ्यांखालून घातल्या. बिग बी यामुळे भलतेच प्रभावित झाले आणि त्यांनी हिंदीत हुबेहुब युके व्हर्जनसारखेच व्हर्जन तयार करावे या अटीवरच शो करायला मान्यता दिली.

अशी आहे बिग बी यांची कर्जबाजारी होण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष

१९९५ मध्ये कंपनीची केली स्थापना, जी १९९६ मध्ये डबघाईला आली

१९९५ मध्ये अमिताभ यांनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ची स्थापना केली होती. पहिल्याच वर्षात कंपनीने ६५ कोटींचा टप्पा पार केला होता आणि १५ कोटींचा नफा कमावला होता. पण दुसऱ्या वर्षी कंपनीला फार फायदा झाला नाही.

१९९६ मध्ये कंपनीने बंगळुरु येथे झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली आणि यामुळे कंपनीला जवळपास ४ कोटींचा तोटा झाला. त्यानंतर बिग बी आणि त्यांच्या व्यावसायिक व्यवस्थापकांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली. यामुळे व्यवस्थापन बदलण्याची कंपनीवर नामुष्की ओढवली. कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेला ‘मृत्युदाता’ चित्रपट डब्यात गेला आणि कंपनी तोट्यात जावू लागली.

पैसे अडकले, कर्ज झालं आणि देणेकरी शिव्यांची लाखोळी वाहू लागले

१९९९ मध्ये अशी वेळ आली की, अमिताभ यांच्याकडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याइतपतही पैसे नव्हते. फिल्म प्रोडक्शन आणि वितरणाचेही पैसे अडकले होते. लोकांचा कंपनीवर असलेला विश्वास कमी होत चालला होता. देणेकरी बिग बी यांना घरी येवून बोल लावू लागले होते. पण, मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिक्षा आणि बिग यांच्या दोन फ्लॅटच्या विक्रीवर निर्बंध आणले होते. यानंतर बिग बी यांना प्रतिक्षा बंगला सहारा इंडिया फायनान्सकडे गहाण ठेवावा लागला.

नातेवाईकांनी टोचले अमिताभ यांचे कान Kaun Banega Crorepati 12

अमिताभ बच्चन यांच्या मते, नातेवाईक त्यांना कंपनी बंद करण्याचा सल्ला देत होते. पण त्यांनी नातेवाईकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना असं वाटत होतं की, लोकं फक्त त्यांच्या नावामुळेच कंपनीशी जोडले गेले आहेत.

अनेक रात्री अमिताभ यांनी जागून काढल्या, त्यानंतर तो दिवस आलाच

एका मुलाखतीत बिग बी यांनी म्हटलं होतं, “माझ्या डोक्यावर सतत टांगती तलवार होती. मी अनेक रात्री जागून काढल्या आहेत. एक दिवस सकाळी-सकाळीच तडक यश चोप्रा यांच्याकडे गेलो आणि त्यांना माझी कंपनी दिवाळखोरीत गेली असल्याचं सांगितलं. माझ्याकडे चित्रपट नाहीत. माझं घर आणि दिल्लीतील छोटीशी प्रॉपर्टीच शिल्लक राहिली आहे. यश चोप्रा यांनी शांतपणे अमिताभ यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना ‘मोहब्बते’ मध्ये भूमिका दिली. यानंतर त्यांना जाहिराती, टीव्ही शोज आणि चित्रपटात भूमिका मिळणं सुरू झालं, यामुळेच मी ९० कोटींचं कर्ज फेडू शकलो.”

कौन बनेगा करोडपतीची ठळक वैशिष्ट्ये

पहिल्यांदा या शोचं नाव ‘कौन बनेगा लखपति’ असं ठेवण्यात आलं होतं आणि खेळातील जास्तीत जास्त रक्कम १ लाख रुपये ठेवण्यात आली होती.पण पुढल्याच महिन्यात स्टार टीव्हीची मालकी असलेल्या न्यूज कॉर्पोरेशनचे चेअरमन रूपर्ट मर्डोक यांनी याचे नाव ‘कौन बनेगा करोडपती’ आणि या खेळातील जास्तीत जास्त रक्कम एक कोटी रुपये करण्याचे निर्देश दिले.

पहिल्याच सीझनमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर दुसऱ्या सीझनच्या सूत्र संचालनाचीही जबाबदारी सोपविण्यात आली. पण, या दरम्यान अमिताभ आजारी पडल्याने शो अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिग बी आजारी पडल्याने ८५ पैकी फक्त ६१ एपिसोडचं शुटिंग पूर्ण झालं होतं.

अमिताभ यांनी तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करण्यास नकार दिला होता. यामुळेच या सीझनमध्ये शाहरुख खानची वर्णी लागली होती, ज्याची सुरूवात उत्तम झाली होती पण त्यानंतर सूत्रसंचालक बदलल्याने हा सीझन फ्लॉप झाला. हा स्टार प्लसवर प्रसारित झालेला शोचा शेवटचा सीझन होता.

Kismat se har panne par, Kismat likhwana padta hai, Wapas aana padta hai. Watch AB recite the opening poem of #KBC12. #KaunBanegaCrorepati starts tonight 9pm only on Sony TV. Amitabh Bachchan Studio NEXT

Sony Entertainment Television यांनी वर पोस्ट केले रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

चौथ्या सीझनपासून ‘केबीसी’ स्टार प्लस ऐवजी सोनी टीव्हीवर प्रसारित होऊ लागला आणि अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालक म्हणून दणक्यात एंट्री केली. तेव्हापासूनच शोने प्रत्येक सीझनसाठी टॅगलाइनही सुरू केली.

या आहेत केबीसीच्या आजवरच्या उत्कंठावर्धक सर्व टॅगलाइन्स

KBC 4 : कोई भी सवाल छोटा नहीं होता ।
KBC 5 : कोई भी इंसान छोटा नहीं होता ।
KBC 6 : सिर्फ ज्ञान ही आपको अपना हक दिलाता है ।
KBC 7 : सीखना बंद तो जीतना बंद ।
KBC 8 : यहां सिर्फ पैसे नहीं, दिल भी जीते जाते हैं ।
KBC 9 : जवाब देने का वक्त आ गया है ।
KBC 10 : कब तक रोकोगे ।
KBC 11 : अडे रहो ।
KBC 12 : जो भी हो, सेटबैक का जवाब कमबैक से दो ।