आरजे ते अभिनयापर्यंतचा यशस्वी प्रवास करणार अभिजीत चाहत्यांना करतोय ‘ही’ कळकळीची विनंती!

रसिकांना १४ जूनपासून अभिजीतचा नवा लुक आणि नवी कामगिरी पहायला मिळणार आहे. या शोचं औचित्य साधत अभिजीतनं 'नवराष्ट्र'शी गप्पा मारल्या.

  आरजे ते अभिनयापर्यंतचा यशस्वी प्रवास करताना सूत्रसंचालनाची जबाबदारीही यशस्वीरीत्या पार पाडणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर आता एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ या गुन्हे कथांवर प्रकाश टाकणाऱ्या मालिकेचा अभिजीत होस्ट बनला आहे. रसिकांना १४ जूनपासून अभिजीतचा नवा लुक आणि नवी कामगिरी पहायला मिळणार आहे. या शोचं औचित्य साधत अभिजीतनं ‘नवराष्ट्र’शी गप्पा मारल्या.

  ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अभिजीतनं साकारलेल्या गुरूवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. त्यानंतर ‘क्रिमिनल्स’मध्ये गुन्हेगारांच्या मागावर निघालेला अभिजीत दिसणार आहे. याबाबत तो म्हणाला की, मी खूप एक्सायटेड आहे. कारण ही भूमिका खूप वेगळी आहे. कलाकाराकडे प्रेक्षक नेहमीच वेगळ्या दृष्टिकोनातून पहात असतात. कलाकारांना समाजभानही असायला हवं या भावनेतूनही प्रेक्षक त्यांच्याकडे पहात त्यांचं अनुकरण करतात. त्यांचा लुक कसा आहे, त्यांची व्यक्तिरेखा कशी आहे, त्यांची बॅाडीलँग्वेज कशी आहे आणि ते कोणता संदेश देतात यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात. ‘क्रिमिनल्स’ हा शो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांपासून सावध रहायला सांगणारा आहे. एखाद्या मनोरंजनपर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं आणि अशा प्रकारच्या एखाद्या शोचा होस्ट असणं यात खूप फरक आहे. कारण हा सत्य परिस्थिती कथन करणारा आहे. त्यामुळं मोठी जबाबदारी असल्याचं मला वाटतं. एखादा पोलीस अधिकारी जेव्हा आपल्याला काहीतरी सांगतो, तेव्हा ते आपण गांभीर्यानं ऐकतो, पण तिच गोष्ट जेव्हा रस्त्यावरून येणारा-जाणारा कोणीही सांगतो, तेव्हा तू नको शिकवू आम्हाला असं म्हणतो. यामुळंच या शोचं सूत्रसंचालन करणं ही मोठी जबाबदारी असल्याचं मी मानतो.

  ‘क्रिमिनल्स’मधील भूमिका साकारताना जबाबदारीचं भान राखणं गरजेचं असल्याचं सांगत अभिजीत म्हणाला की, सोनी मराठी वाहिनीनं माझ्यावर ही जबाबदारी मोठ्या विश्वासानं सोपावल्याचा आनंद आहे. अशा प्रकारची मालिका घराघरात पोहोचवण्यासाठी सोनी मराठी वाहिनीसारखं चांगलं माध्यम लाभल्यानं ‘क्रिमिनल्स’बाबत उत्सुक आहे. आपण आपल्या घरच्यांना किंवा नातेवाईकांना भेटल्यावर त्यांच्या काळजीपोटी आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना जशा आपलुलकीनं सांगतो तोच आपुलकीचा रोख ‘क्रिमिनल्स’चं सूत्रसंचालन करताना असणार आहे. कोणताही आविर्भाव आणून किंवा नाटकी हावभाव करून विशेष काही साध्य होत नाही. गुन्हेगारी घटनांचं जरी आम्ही नाट्यमय रूपांतर दाखवणार असलो तरी या केसेस कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात घडलेल्या असून, तुमच्या आमच्यासारखीच माणसं असणाऱ्या पोलिसांनी अत्यंत मेहनतीनं गुन्ह्यांचा शोध लावला आहे. गुन्हेगारांना सजा देऊन लोकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळं ते त्याच पद्धतीनं यायला हवं असं मला वाटतं. अद्याप शैलीचा विचार केला नसला तरी कोणतीही केस तळमळीनं सांगण्याचा माझा प्रयत्न असेल.

  पोलिसांमधील माणूस पाहण्याची संधी

  अद्याप ‘क्रिमिनल्स’चं शूट सुरू झालेलं नसलं तरी या निमित्तानं मला पोलिसांमधील माणूस पाहण्याची संधी मिळेल. कारण यापूर्वी अशा प्रकारच्या शोजच्या निवेदकांना किंवा त्यामध्ये काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसुद्धा पोलिसांचे फार वेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. माझ्या मित्रानं हिंदी सोनीवरील ‘क्राइम पट्रोल’मध्ये पोलिसांची भूमिका साकारली. त्या भूमिकेमुळं त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना ते जबाबदार वाटल्यानं बऱ्याचदा छोटी-मोठी भांडणं सोडवण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला जातो. अनुप सोनी यांनाही पोलीस वर्तुळात मानाचं आणि जबाबदारीचं स्थान आहे. कारण एखादी केस सोडवल्यानंतर पोलिसांची जाहिरात केली जात नाही. अशा शोच्या माध्यमातूनच त्यांचं कर्तृत्व समाजासमोर येतं. त्यामुळं आपली चांगली बाजू समोर येते हे पाहिल्यावर पोलीस बांधवांनाही आनंद होतो. त्यामुळं या शोबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रीयाही मला जाणून घ्यायच्या आहेत.

  सतर्क रहायला शिकवणार

  आपण नेहमी चांगल्या गोष्टींकडे पाहणं आवश्यक आहे. अनेकदा माध्यमांमध्ये चर्चा होते की, तुम्ही चित्रपट किंवा टीव्हीवर जे दाखवता त्याचं अनुकरण केलं जातं, पण समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच इथे दाखवल्या जातात हे लक्षात घेतलं पाहिजे. यातून चांगलं घ्यायचं की वाईट हे प्रत्येकावर अवलंबून आहे. त्यामुळं ‘क्रिमिनल्स’ पाहून समाज सतर्क होईल, सावध होईल आणि आजूबाजूला घाडणाऱ्या गुन्ह्यांबाबत सावधानता बाळगली जाईल याच नजरेतून मी या शोकडे पहातोय. याला एखाद-दुसरी व्यक्ती अपवाद ठरू शकते. दोन जणांनी गुन्हेगार होऊ नये यासाठी घडलेल्या गुन्ह्यांच्या केसेस न दाखवण्यापेक्षा २०० जणांना सतर्क करण्यासाठी हे दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळं संभाव्य गुन्हे टळू शकतात.

  हे रूपही प्रेक्षक प्रेमानं स्वीकारतील

  मराठी प्रेक्षक फार सुजाण आहेत. आतापर्यंत मी तीन वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांच्यासमोर आलो आहे. त्यांनी मोठ्या दिलानं माझ्यावर प्रेम केलं आहे. त्यामुळंच ‘क्रिमिनल्स’च्या माध्यमातून एका नव्या रूपात समोर येताना प्रेक्षक तेवढ्याच प्रेमानं स्वीकार करतील याची खात्री आहे. राकेश सारंग यांच्या कॅम्प्स क्लब या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनणाऱ्या या शोचं दिग्दर्शन गिरीश वसईकर करणार आहेत. माझे दोन सिनेमे आणि वेब सिरीज तयार आहे. एका वेब सिरीजचं शूट सुरू हेाणार होतं, पण लॅाकडाऊनमुळं पुढे गेलं आहे. आता शूटिंगची परवानगी मिळाल्यानंतर पुढील काम सुरू होईल अशी आशा आहे.

  एवढीच कळकळीची विनंती

  आज आपण सर्वच जण सध्या कठीण काळातून जात आहोत. घरी बसून कंटाळा आल्यानं सर्वांना बाहेर पडावंसं वाटत आहे. काहींना मात्र कामानिमित्त बाहेर पडावं लागत आहे. यात फ्रंटलाईन वर्कर्स, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे जीवावर उदार होऊन आपल्या रक्षणासाठी कार्यरत आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी घराबाहेर न पडणं आणि मास्क वापरणं या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. यापेक्षा जास्त अपेक्षा नाही. थोडी कळ सोसायला हवी. आपण जबाबदार नागरीक असल्याचं भान प्रत्येकानं राखायला हवं इतकीच कळकळीची विनंती करेन.