मैत्रीच्या ‘शांती’साठी अभयची ‘क्रांती’!

'शांतीत क्रांती'ला मिळत असलेल्या यशाचा आनंद 'नवराष्ट्र'सोबत शेअर करत अभयनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

  नेहमीच काहीशा वेगळ्या भूमिकांमध्ये दिसलेला अभय महाजन नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शांतीत क्रांती’ या वेब सिरीजमध्ये आजवर कधीही न दिसलेल्या रूपात समोर आला आहे. सारंग साठ्ये आणि पॅाला मॅकग्लिन यांनी दिग्दर्शित केलेली ही वेब सिरीज सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली आहे. ‘शांतीत क्रांती’ला मिळत असलेल्या यशाचा आनंद ‘नवराष्ट्र’सोबत शेअर करत अभयनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

  आजवर केवळ अभिनय केलेल्या अभयनं ‘शांतीत क्रांती’चं लेखनही केलं आहे. या अनुभवाबाबत अभय म्हणाला की, ‘शांतीत क्रांती’ या वेब सिरीजबाबत मनात खूप इमोशन्स आहे. या मागचं पहिलं कारण म्हणजे याची कॅान्सेप्ट माझी आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी मला ही गोष्ट सुचली होती. त्यावर खूप काम केलं. त्यावेळी भाडिपा ही संस्था खूप नवीन होती. त्यांना ही गोष्ट खूप आवडली. यावर आम्ही चार-पाच वर्षे एकत्र काम केलं. एकदा सहज अरुणा कुमारना याबाबत म्हणालो. मराठीत काम करण्याची इच्छा आहे का असं मी त्यांना विचारलं. त्यांनी होकार दिला. तोपर्यंत त्यांनी मराठीत काही काम केलेलं नव्हतं. मी त्यांच्यासोबत ‘टीचर्स’ केल्यानं आमचे संबंध खूप चांगले होते. भाडिपासोबत मिळून त्यांनी ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. विशेष म्हणजे ‘शांतीत क्रांती’ला त्यांनी रिजनल शोसारखं ट्रीट केलेलं नाही. त्यांच्या मुख्य प्रवाहातील हिंदी शोसारखी वागणूक देत ‘शांतीत क्रांती’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली. क्रिकेट मॅचेसमध्ये या शोचे ट्रेलर दाखवण्यात आले. मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदाच घडली होती. पहिल्यांदाच मी एखादी गोष्ट लिहीली आणि ती इतक्या चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचली आणि सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक होतंय याचा खूप आनंद आणि समाधान आहे. यापूर्वी नाटकं लिहीली, पण वेब सिरीज पहिल्यांदाच लिहीली आहे. तुम्हाला एखादा नवीन विचार मांडताना करावा लागणारा संघर्ष आणि त्याची प्रोसेस मी अगदी जवळून पाहिली आहे. या शोमध्ये मी फक्त अॅक्टर म्हणून कधीच सहभागी नव्हतो. माझ्यासह या शोचे दिग्दर्शक सारंग साठ्ये, पॅाला मॅकग्लिन, अनुषा आम्ही चौघांनी सहा वर्षे या सिरीजवर काम केलं आहे. त्यामुळं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. ही वेब सिरीज खूप आवडत असल्याच्या प्रतिक्रीया प्रेक्षकांकडून येत असल्याचा अतिशय आनंद आहे.

  ‘शांतीत क्रांती’चं वेगळेपण
  इतरांपेक्षा या वेब शोबाबत सांगायला मला आवडेल. या शोचा खरा नायक कथा असली तरी, समोर दिसणारे तीन हिरो आहेत. तिघांचेही सीन्सही समान आहेत. आपल्याकडे स्टाईलच्या बाबतीत वास्तवापेक्षा खूप वेगळं सादर केलं जात आहे, ते पाहून आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचं वातावरण, भाषा, ह्युमर नसल्याचं जाणवायचं. ‘शांतीत क्रांती’मध्ये रिअल वातावरण सादर केलं आहे. त्यामुळं अशा प्रकारे शूट झालेला शो अद्याप आलेला नाही. तिघांची मैत्री खूप घट्ट असल्यानं यात सर्व प्रकारच्या शेडस आहेत. सिरीज असल्यानं गोष्टी हळूहळू उलगडत बारकाईनं पहायला मिळतात, जे सिनेमात दाखवता येत नाही. माझ्या कॅरेक्टरबाबत सांगायचं तर मी साकारलेल्या श्रेयसला वडील नाहीत. त्याची आई बिझनेसवूमन आहे. वडील नसल्यानं लहानपणापासून खूप एकटा आहे. त्याच्या आयुष्यात फक्त दोन मित्रच आहेत; किंबहुना दोन मित्रच त्याचं आयुष्य आहे. या मित्रांसाठी काहीही करण्याचा त्याचा स्वभाव आहे. खूप प्रेमळ आहे, पण सतत एकटा राहिल्यानं लोकांसोबत कसं वागायचं हे कित्येकदा त्याला समजत नाही.

  ‘दिल चाहता है’ ग्रुप
  लहानपणापासून माझ्या मित्रांचा ‘दिल चाहता है’ नावाचा ग्रुप आहे. आम्हा सर्वांनाच ‘दिल चाहता है’ आकर्षण होतं. आमच्यातील आमिर खान कोण आहे, यावरून ग्रुपमध्ये नेहमी भांडण व्हायचं. सर्वांना आमिर व्हायचं असायचं, तेव्हा मला प्रश्न पडायचा की, आमिर व्हायचंय म्हणजे नेमकं काय व्हायचंय? सैफ अली खान आणि अक्षय खन्ना नसते तर आमिरला काही अर्थ नाही, पण त्याच वेळी या चित्रपटात सर्वात जास्त स्क्रीन टाईम आमिरलाच आहे हे देखील जाणवायचं. त्यांनी हिरो म्हणूनही आमिरलाच पुश केलंय. पोस्टरवरही तोच मोठा दिसतो. त्यामुळं हिरो विषयीची संकल्पना नेमकी काय आहे. एक माणूस मुख्य नसतो, तर सर्वच महत्त्वाचे असतात, असं होऊ शकतं का? अशा प्रकारे मैत्रीकडं बघता येऊ शकतं का? जेणेकरून आपण सर्वच गोष्टींकडे नव्यानं पाहू शकू. मी मेन असण्यापेक्षा या दोघांमुळे मी आहे आणि माझ्यामुळं हे दोघं आहेत अशा प्रकारचा नवीन विचार या वेब शोमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हिरोजकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकतं का? या विचारातून ही गोष्ट सुचली आहे.

  मित्रांसोबत रोड ट्रीप
  खरं तर आजही माझ्याकडे कार नाही. या शोमुळं मी कार चालवायला शिकलोय. यात मी साकारलेला श्रेयस तीन मित्रांमध्ये श्रीमंत आहे. त्यामुळं कार असणं आणि कार चालवता येणं ही या कॅरेक्टरची गरज होती. खरं तर गोष्ट मी लिहिली असल्यानं तिघांपैकी कोणतं कॅरेक्टर मी करायचं हे मीच ठरवायचं होतं, पण मी तिनही कॅरेक्टर्सच्या प्रेमात होतो. आजवर मी गरीब मुलांचे रोल केलेले असल्यानं या शो मध्ये श्रीमंत तरुणाचा रोल करूया या विचारानं श्रेयस स्वीकारला, पण श्रेयस ड्राइव्ह करत असल्याचं मी आधीच लिहीलं होतं. मला ड्रायव्हींग येत नसल्यानं शूटिंगपूर्वी आपण ते बदलू असं मी सारंगला म्हणालो, पण तो म्हणाला नाही बदलायचं. या भूमिकेसाठी तुला कार चालवायला शिकावं लागेल. आठ दिवसांमध्ये गाडी चालवायला शिकलो. याउलट ललित प्रभाकर हा रेसिंग करण्याइतपत चांगला ड्रायव्हर आहे.

  वास्तवातही आम्ही मित्रच आहोत
  आलोक आणि मी वयाच्या १६व्या वर्षापासून एकत्र काम सुरू केलं. आजवर आम्ही जी नाटकं केली त्यापैकी कदाचित केवळ चार किंवा पाच नाटकांमध्ये आम्ही एकत्र नसू. त्यामुळं आमची मैत्री खूप मुरलेली आहे. एकमेकांबाबत सर्व गोष्टी माहित आहेत. ललित याबाबतीत खूपच नवीन होता, पण तो देखील आमच्यात मिसळून गेला. तिघांनाही एकमेकांच्या कामाबाबत खूप रिस्पेक्ट होता. तिघांनाही एकमेकांच्या कामाचे चॅाईसेस आवडत होते आणि कामातील वेगळेपण जाणवत होतं. तिघांमध्ये नट म्हणून कुठल्याच प्रकारची स्पर्धा नव्हती. त्यामुळं आमचं काम आणि नातंही स्पर्धेच्याही पलिकडं गेलं होतं. ‘शांतीत क्रांती’मुळं मला ललितसारखा छान मित्र मिळाला. ‘शांतीत क्रांती २’मध्ये आमच्या मैत्रीचे आणखी वेगळे पैलू पहायला मिळतील.

  सारंगनं तरुणाईची आवड ओळखलीय
  सारंग हा आलोक आणि माझा कॅालेजपासूनचा मित्र आहे. आम्ही नाटकात त्याच्यासोबत काम केलं आहे. सारंग नटापेक्षा दिग्दर्शक खूप छान असल्याचं मला वाटतं. त्याची स्टाईल आणि दिग्दर्शनातील इतर गोष्टी खूप प्रभावित करणाऱ्या आहेत. यात त्यानं अभिनय करावा यावर मध्यंतरी आम्ही विचार करत होतो, पण सारंगला वाटलं की तो दिग्दर्शन चांगलं करू शकतो. मागील काही वर्षांमध्ये त्यानं भाडिपासारखा मोठा प्लॅटफॅार्म प्रचंड मेहनतीनं उभा केला आहे. भाडिपाचा मेन आॅडियन्स हा १५ ते २१ वर्षे वयोगटातील आहे. भाडिपाची टीमही त्याच वयोगटातील आहे. सारंगला नवीन पिढीविषयी खूप माहित आहे. त्यानं तरुणाईची आवड जाणलीय. सारंगनं तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील रसिकांना आवडेल अशा शैलीत ‘शांतीत क्रांती’चं दिग्दर्शन करत प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे.